जळगाव : पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव येथील ४ वर्षीय मुलीवर बिस्किटचा पुडा खायला देतो असे सांगून रेल्वे पटरीच्या बाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. या आरोपीला विशेष न्यायालयाने 60 दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करून आरोपी सावळाराम शिंदेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला तीन लाखाचा दंडही सुनावला असून या दंडातील पन्नास टक्के रक्कम पीडितेला देण्याचे न्यायालयाने सांगितले आहेत. मुलीच्या पुनर्वसनासाठी दहा लाख रुपये द्यावे असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
चाळीसगाव येथील अल्पवयीन मुलीला आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (वय २७) याने बिस्कीटचा पुडा देतो असे सांगून रेल्वे पटरीच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी आरोपी व पीडीत मुलीचे अंगावरील सॅम्पल तात्काळ प्रयोगशाळेत पाठवले. डीएनए अहवाल प्राप्त करून गुन्ह्याचा 17 दिवसात तपास पुर्ण केल्यानंतर विषेश न्यायालयात एस. एन. माने-गाडेकर यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने जलद गतीने खटल्याची सुनावणी करून आरोपी सावळाराम शिंदे याला आज विविध कलमानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचार केल्यामुळे मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला २८ नोव्हेंबर २१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गु. र. नं. ४३७/२०२१ भा.द.वि.क. ३६३, ३६६ (अ), ३७६ (अ,ब), बालकांचे लैंगिक अपराधापासुनसंरक्षण अधिनियम कलम ३ (अ ),४,५ ( म )( न ),६ ,८ ,९(आय) (म) (न), व १० प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधिक्षक. डॉ. प्रविण मुंढे यांनी गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव कैलास गावडे यांचेकडे वर्ग केला होता.
विषेश न्यायालयास सदर गुन्हयाचा खटला जलदगतीने चालविण्यात यावा अशी विनंती केल्याने विशेष न्यायालयाने सदरचा खटला जलदगतीने चालवून 60 दिवसात सुनावणी पुर्ण करून आज दि. 16 रोजी खटल्याचा निकाल दिला आहे. आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास आजन्म कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. खटल्याचे कामकाज पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पो. कॉ. दिलीप सत्रे यांनी पाहिले. आरोपीस शिक्षा झाल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.