

कराड : पुढारी वृत्तसेवा
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कराड तालुक्यातील गोटेवाडी सारख्या दुर्गम भागातून शिक्षण घेऊन गावचे सुपूत्र पंकज कृष्णा आमले यांनी पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल पोलिस उपनिरिक्षक होत नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. पंकज यांच्या शिक्षणासाठी वडील राहतं घर विकायला तयार झाले होते. तर आईने दागिणे मोडले, अशा खडतर परिस्थितीत पंकज आमले यांनी उच्च शिक्षण घेऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकतीच त्यांची केंद्रिय पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
पंकज आमले यांनी पोलिस उपनिरिक्षक पदापर्यंत झेप घेण्यासाठी अत्यंत खडतर प्रवास केला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंकज आमले यांनी अर्थिक अडचणीमुळे इंजिनिअरिंग सोडून बी.ए.ला प्रवेश घेतला. तो त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांचे पहिली पासून सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोटेवाडी येथे झाले. 2014 ला 12 वी झाली, सीईटी मध्ये चांगले गुण मिळाले. त्या आधारावर कोणत्याही खाजगी कॉलेजमध्ये फार्मसी डिग्री साठी प्रवेश मिळत होता. परंतु खर्च परवडणारा नव्हता. म्हणून गवर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला तर घ्यायचा हे त्यांनी ठरवलं. फार्मसी डिग्री (बीफार्म) साठी रत्नागिरी गवर्नमेंटची सीट एका गुणाने हुकली आणि जवळच्या कॉलेजची सीट कॅप राऊंड मधून मिळाली. मेरीट वर सीट मिळाली होती. त्यामुळं केवळ फी भरायची होती. परंतु खाजगी कॉलेजची फी भरण्यासारखी सुध्दा आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही.
फार्मसीला प्रवेश घेऊन देण्यासाठी वडील राहतं घर सुध्दा विकायला तयार झाले. परंतु त्यास नकार देऊन पंकज यांनी इंजिनिअरिंग ला मिळालेला प्रवेश सोडून बी.ए.साठी प्रवेश घेतला. कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देत त्यांनी आपला मार्ग स्वतः निवडला. वर्कशॉपमध्ये हेल्पर, कुरिअर कंपनीत काम करत आणि शिकवण्या घेऊन आर्थिक परिस्थितीवर मात करत डिस्टिंक्शन घेऊन 2018 साली डबल ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि पुढच्याच वर्षी 2019 ला एसएससीसीपीओ ची पूर्व परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाले.कोरोनामुळे परीक्षा लांबली गेली. तीन वर्षे वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून फार्मा कंपनीत नोकरी करून घरी हातभार लावत अभ्यास केला आणि त्यांची पहिल्या प्रयत्नात प्रथम प्राधान्यक्रमाच्या पदावर सीआयएसफ मध्ये केंद्रिय पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
या वाटचालीत त्यांना अत्यंत बिकट कासोट्यांचा सामना करावा लागला. परंतु त्यातून मार्ग काढत आई वडिलांनी पुढं जाण्याचे धडे दिल्याचे पंकज यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे मैदाने खुली नव्हती परंतु आगाशिव डोंगर, कासेगाव, बेलवडे अशा ठिकाणी जाऊन शारीरिक चाचणीची तयारी केली. 1600 मीटर शर्यतीत प्रथम आले. सगळे इव्हेंट पहिल्या प्रयत्नात पास केले परंतु चुकीच्या पद्धतीने छाती मोजून टेप तुटला तरी अपात्र ठरविले. यावर आय.जी.साहेबांकडे दाद मागितली व फेरतपासणी मध्ये पास झाले.कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय नोकरीतून वेळ मिळेल तसा स्वतः अभ्यास केला. मुख्य परीक्षेला जाताना प्रचंड पावसामुळे सर्व गाड्या बंद होत्या. त्यावेळी 4 कि.मी. गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन मिळेल त्या गाडीने मुंबई गाठली. 200 पैकी 185 गुण मिळवून देशात मेरिट मध्ये आले. वडिलांनी माथाडी कामगार म्हणून काबाड कष्ट केले. आईने, बहिणीने सुध्दा काम करून घरी हातभार लावला. आईने घरासाठी, पुस्तकांसाठी दागिने मोडले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून आई वडिलांच्या कष्टाचं सार्थक करायची जिद्द मनात घेऊन तयारी केली आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे पद मिळाले. आम्हाला त्यांनी संस्कारांची जी शिदोरी दिली तिच्या जोरावर आयुष्यातील कोणत्याही संकटावर मात करण्याचं बळ मिळत राहील ही भावना पंकज आमले यांनी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?