सातारा : ऐतिहासिक ठेव्यांचे आयुष्यमान वाढणार | पुढारी

सातारा : ऐतिहासिक ठेव्यांचे आयुष्यमान वाढणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती घराण्याची महती जगभर आहे. इतिहासकालीन घराण्याविषयी व त्यांच्या सुवर्ण युगाविषयी माहितीचे पुरावे आजही पहावयास मिळतात. यातील अनेक पुरावे देश-विदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काही पुरावे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असून त्याचे आयुष्यमान वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने या ऐतिहासिक ऐवजाच्या संवर्धनाचे काम सुरू आहे.

१०० ते ४०० वर्षांहून अधिक कालावधीपूर्वीची शस्त्रे, वस्त्रे व पेंटिंग छत्रपती शिवाजी संग्रहालयात उपलब्ध आहेत. हवेतील आर्द्रता, वातावरणातील बदल यामुळे संग्रहालयातील आकर्षण असलेल्या येथील वस्तू जीर्ण होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. यामुळे या वस्तूंच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय विभाग, मुंबईचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले आहे.

अभिरक्षक प्रविण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली किर्ती जोशी, मिर्झा शाहिद, आनंद शेळके व मधुरा शेळके यांच्याकडून हे काम सुरू आहे. तख्त (साताऱ्याची गादी), या संबंधीच्या सर्व वस्तू, १७ मिनिचर पेंटिंग, सोन्याची जर असलेल्या रेशमी साड्या, पैठणी साड्या, कापडी चिलखत आदींसह इतर अंगवस्त्रांचे येथे तज्ज्ञांकडून संवर्धन करण्यात येत आहे. या वस्तूंवरील धूळ साफ करून त्या पुढील अनेक वर्षे जतन करण्याचे काम या अंतर्गत करण्यात येत आहे. कोरोनामुळे संग्रहालयाची नवीन इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात होती. ही इमारत संग्रहालयाच्या ताब्यात मिळताच लवकरच सातारकर, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी यांचे बऱ्याच दिवसानंतर स्वप्न पूर्ण होणार आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button