काणकोण: पुढारी वृत्तसेवा : अमेठीतून निवडणूक हरलेल्या नेत्याला गोव्यात येऊन आपल्या उमेदवारांकडून दुसर्या पक्षात जाणार नाही, याची शपथ घ्यावी लागते. याचा अर्थ पक्षाच्या नेत्यालाच आपल्या उमेदवारावर विश्वास नाही, असा होतो, यासारखे दुर्दैव नसल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षावर केली. त्या भाजपच्या काणकोणचे उमेदवार रमेश तवडकर यांच्या चावडी येथील जाहीर सभेत बोलत होत्या.भाजप सरकारने कोरोनावरील लस, वीज, कल्याणकारी योजनांचा लाभ देताना जात, धर्म याचा विचार केला नाही,असेही त्या म्हणाल्या.
ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने आपण काम केले. ते काम काणकोणमधील जनतेला भावले. त्यामुळेच मोठ्या संख्येने जनतेचा पाठिंबा लाभत असल्याचे भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांनी चावडी येथील जाहीरसभेत सांगितले. अनुसुचित समाजाच्या न्यायहक्कासाठी सर्व आंदोलनात तवडकर यांनी पुढाकार घेतला, याचा आपल्याला गर्व असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिडामंत्री म्हणून जेवढ्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, त्या आजपर्यंत झाल्या नाहीत. विद्यमान आमदाराने मी केलेल्या विकासकामांपैकी दहा टक्केसुद्धा काम केलेले नाही, याचा पुनरुच्चार केला. यंदाच्या निवडणुकीत मिळणार प्रतिसाद हा आजपर्यतच्या निवडणुकीत आपण पाहिला नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कर्नाटकाचे माजी आमदार सुनील हेगडे, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार निवडून दिल्यानंतर भाजपात जातात. त्याचसाठी प्रत्यक्ष भाजपच्या पक्षाच्या उमेदवारालाच समर्थन दिल्याचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, लक्ष्मण पागी, चंदा देसाई, आगोंदचे माजी सरपंच शाबा नाईक गावकर, माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी यांची भाषणे झाली. (स्मृती इराणी)
हेही वाचलत का?