वर्धा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून; तिघांना ६ दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

वर्धा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून; तिघांना ६ दिवसांची पोलीस कोठडी

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : नवीन आष्टी येथे पत्नीनेच प्रियकर व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी मृतकाच्या पत्नीसह प्रियकर आणि इतर एका संशयिताला अटक केली आहे. या तिघांनाही 6 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवीन आष्टी येथील परिसरात ४ फेब्रुवारी रोजी एका पोत्यात मृतदेह मिळून आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर आष्टीतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

पोलीसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असता, तो जगदीश भानुदास देशमुख (वय ३५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृत जगदीश यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या खुनाची चौकशी सुरू केली असता, मृतकाची पत्नी व इतर नातेवाईकांकडे पोलीसांनी विचारपूस केली. त्यावेळी हा खून जगदीश यांच्या पत्नीनेच केल्याचा पोलीसांचा संशय बळावला.

या घटनेच्या एक दिवस आधी मृत जगदीशची पत्नी, तिचा प्रियकर शुभम भीमराव जाधव तसेच शुभमचा चुलत मामा विजय रामदास माने यांनी, जगदीश यास जीवे मारण्याचा कट रचला होता अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button