पाटण नगरपंचायत निवडणुक : स्विकृतसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग | पुढारी

पाटण नगरपंचायत निवडणुक : स्विकृतसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

पाटण, पुढारी वृत्तसेवा; पाटण नगरपंचायत निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष निवड लवकरच होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्विकृत नगरसेवक पदासाठी अनेकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तर काहींची इच्छा नसतानाही त्यांच्या गुडघ्याला बाशिंग बांधून राजकीय बोहल्यावर चढविण्याचा काहींचा प्रयत्न आहे.

अवघ्या दोन जागांसाठी कमालीचे चुरस असून नेत्यांची डोकेदुखी वाढविण्याचे प्रयत्न करणारे नेत्यांचे हितचिंतक की हितशत्रू ? याचं आत्मचिंतनही होण्याची खरी गरज आहे. पाटण नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकरांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नगरसेवकांच्या निवडी, नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षणही जाहीर झाले.

त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तथा पाटणकर गटाकडे सौ. अनिता देवकांत व सौ. मंगल कांबळे या दोन नगरसेविका असून यापैकी एक नगरसेविकेची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याच्या शक्यता आहेत . त्याचवेळी उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक असल्याने त्यावर कोणाची वर्णी लागणार ? याकडेही सर्वांच्याच नजरा आहेत .या दरम्यानच नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभाही होईल व त्यानंतरच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी काहींना इच्छा नसतानाही बोहल्यावर चढविताना त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांच्या खच्चीकरणाचाही अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहे. सत्यजितसिंह पाटणकरांनी गेल्या काही महिन्यांपासून ऐनवेळी परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम सुरू केला असतानाही काहींचा हितचिंतकांच्या नावाखाली हितशत्रूचा डाव ओळखण्याइतपत कोणीच अडाणी नसल्याच्याही चर्चा आहेत.

नगरपंचायत निवडणुकीतही काही वाचाळवीरांनी विशिष्ट प्रभागात जाती धर्माचं राजकारण करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मतदारांनी मतदानातून अशा अपप्रवृत्तींच्या पुन्हा श्रीमुखात भडकावली. स्विकृत नगरसेवक निवडीला अद्याप बराच कालावधी आहे . पहिल्यांदा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी, सर्वसाधारण सभा व त्यानंतरच या स्विकृतची प्रक्रिया सुरू होणार आहे.

माघार घेतलेल्यांसह पराभूतही आघाडीवर…

पाटणसाठी दोन स्विकृत नगरसेवक पदे असल्याने येथे बहुमताच्या जोरावर दोन्ही स्वीकृत नगरसेवक पाटणकर गटाचेच होणार आहेत. त्यासाठी तांत्रिक, कायदेशीर बाबीही महत्त्वाच्या आहेत. अभियंता, वकील, डॉक्टर, समाजसेवक, अधिकृत सामाजिक संस्था प्रतिनिधी व अन्य तांत्रिक, कायदेशीर बाबी या पदासाठी गरजेच्या असतात. याबाबतची माहिती असूनही काही मंडळींनी तात्पुरत्या सोईसाठी अनेकांना स्विकृतचे राजकीय ‘गाजर’ दाखविले. निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतलेले किंवा प्रत्यक्ष निवडणूक होऊन पराभूत झालेले अनेक उमेदवार पुन्हा स्विकृतसाठी इच्छुक आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button