सातारा : सिटी सर्व्हेचे कामकाज झाले ऑनलाईन | पुढारी

सातारा : सिटी सर्व्हेचे कामकाज झाले ऑनलाईन

सातारा : आदेश खताळ; जिल्ह्यातील नगर भूमापन (सिटी सर्व्हे) कार्यालयांचे कामकाज ऑनलाईन झाले आहे. प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका), सातबारा, फेरफार एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसाही वाचणार आहे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख राजेंद्र गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर भूमापन कार्यालयांचे कामकाज गतीमान झाले आहे.

नगर भूमापन कार्यालयात मिळकतीच्या अनुषंगाने विविध कारणांनी मिळकतदारांना यावे लागते. नगर भूमापन कार्यालयाच्या बर्‍याच सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. सिटी सर्व्हेला मिळकतीची नोंद झाल्यानंतर तयार होणारी डिजिटल मिळकतपत्रिका घरबसल्या पाहता येणार आहे. या मिळकतपत्रिकेत त्रुटीही समजू शकणार असल्यामुळे त्या वेळेत दुरुस्त करण्यासाठी पुनर्विलोकनसारखी प्रक्रिया वेळेत करणे मिळकतदारांना शक्य होणार आहे.

पूर्वी मिळकतपत्रिका मिळवण्यासाठी मिळकतदारांना बरेच सोपस्कार पार पाडावे लागत होते. सोयीसाठी नगर भूमापन कार्यालयाने एक खिडकी योजनाही सुरु केली होती. एका मिळकतपत्रिकेसाठी सुमारे 200 ते 500 रुपये आकारले जायचे. आता 90 ते 135 रुपयांमध्ये डिजिटल मिळकतपत्रिका मिळणार आहे. ग्रामीण भागासाठी ऑनलाईन मिळकत पत्रिकेचा हा दर 90 तर शहरी भागासाठी 135 रुपये आहे. मिळकतीच्या मोजणीची प्रकरणे नगर भूमापन कार्यालयात दाखल होतात. या ऑनलाईन सेवेमध्ये जागा मोजणी अर्जासाठीही टॅब उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मिळकतदारांनी ऑनलाईन अर्ज व पेमेंट केल्यानंतर या मोजणीच्या अनुषंगाने नोटीस काढली जाते. या नोटीशीची माहिती घेण्यासाठी मिळकतदार सतत कार्यालयात येत असतात. मोजणी नोटीशीची माहितीही ऑनलाईन पाहता येणार आहे. मिळकतीच्या अनुषंगाने व्यवहार झाल्यास त्याचा फेरफार 30 दिवसांत मंजूर होतो. ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे फेरफार मंजूर झाल्याची माहितीही क्लिकवर मिळणार आहे. मिळकतीच्या अनुषंगाने बरेच वाद आहेत.

नगर भूमान अधिकार्‍यांकडे केसेसही चालवल्या जातात. फेरफार, पुनर्विलोकन व इतर प्रकरणांत सुनावणी झाल्यावर त्याची माहितीही नगर भूमानच्या ऑनलाईन सेवेद्वारे पाहता येवू शकते. भविष्यात त्याची प्रत हवी त्यावेळी मिळकतदारांना उपलब्ध होवू शकते. नगर भूमापन कार्यालयांमध्ये तालुक्यातून मिळकतदार, पक्षकार येत असतात. त्यांना हवी असणारी कागदपत्रे वेळेत मिळावीत आणि कार्यालयाचे कामकाज गतीमान व्हावे यासाठी भूमि अभिलेख विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन सुविधांचा फायदा नागरिकांना होणार आहे. या ऑनलाईन सुविधांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सातारा नगर भूमापन कार्यालयाबाहेर बोर्ड लावण्यात आला आहे. त्यावर सेवा आणि त्यासमोर वेबसाईची माहिती देण्यात आली आहे. हा बोर्ड पाहून नागरिक या ऑनलाईन सेवांचा लाभ घेत आहेत.

या संकेतस्थळावर मिळणार ऑनलाईन सेवा

मोजणी अर्जाची सद्यस्थिती – https://emojni.mahabhumi.gov.in/
अपिल प्रकरणांसाठी -https://eqjcourts.gov.in
डिजिटल मिळकतपत्रिका -https://mahabhumi.gov.in/
1) digital signed 7/12. 8A,
Mutation& PR card
फेरफार नोंद नोटीस – 2) Applichawadi (village notice board)
फेरफार नोंद – 3) bhulekh (view online 7/12. 8A, PR card)

फेरफार नोंदवही – 4) PR Card application status

जिल्हा अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु आहे. नगर भूमापन कार्यालयाकडून ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. डिजीटल प्रॉपर्टी कार्ड, सातबारे, फेरफार, नोटीशी, अपिलांच्या सद्यस्थिती इत्यादींची माहिती मिळकतदार, पक्षकारांना घरबसल्या मिळणार आहे. या सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
– किरण नाईक
नगर भूमापन अधिकारी, सातारा

 

Back to top button