सातारा : बिबट्याची दहशत, ऊसतोडीवर परिणाम | पुढारी

सातारा : बिबट्याची दहशत, ऊसतोडीवर परिणाम

ढेबेवाडी : पुढारी वृत्तसेवा

ऑक्टोंबर 2021 मध्ये बिबट्याने येणके (ता. कराड) येथे हल्ला करून ऊस तोड कामगारांच्या मुलाचा बळी घेतला होता. तर 20 जानेवारीला पुन्हा बिबट्याने हल्ला करून किरपे येथील राज देवकर या मुलाला गंभीर जखमी केले. सुदैवाने मुलाचे प्राण वाचले तरी ऊस तोडणी कामगार भयभीत झाल्याने तोडणीवर अनिष्ट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आणे, येणके, किरपे व परिसरातील विविध गावातील शेतकर्‍यांचा ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर करावा, अशी मागणी किरपे गावच्या सरपंच पद्मा देवकर यांनी केली आहे.

याबाबत कराड व पाटण तालुक्यातील मरळी, सह्याद्री, रयत, कृष्णा अशा सहकारी साखर कारखान्यांना आवाहन करणारे एक निवेदन सरंपच सौ.देवकर यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटल्याप्रमाणे दोन महिन्यात सुरुवातीला येणके तर दुसर्‍यांदा किरपे येथे बिबट्याने लहान मुलांवर हल्ले केले आहेत. पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारणे ही बिबट्याची नित्याची बाब झाली आहे. पण मानवावरही हल्ले होऊ लागले आहेत, ही बाब गंभीर आहे. ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातून येणारे गोरगरीब कामगार हे परिस्थितीने असहाय्य आहेत. त्यांना त्यांचा संसार, मुलेबाळे पाठीवर बांधून ऊस तोडणीची कामे करावी लागतात. त्यांचे प्राणही तितकेच महत्त्वाचे आहेत. मात्र बिबट्यांचे हल्ले वारंवार होऊ लागल्याने ते भयभीत झाले आहेत. ऊस तोडणीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे.

बिबट्यामुळे ऊसतोडीवर परिणाम
बिबट्यामुळे ऊसतोडीवर परिणाम

ज्यावेळी बिबट्या व माणूस संघर्ष वा दुर्घटना होते, त्यावेळी वनखाते गोड बोलून मोठी – मोठी आश्‍वासने देत बंदोबस्ताची वचने देतात. पण, त्यानंतर पुढे कांहीच होत नाही. येणके येथील तो बिबट्या पकडल्याचे सांगितले जात असले तरी तो त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण पुन्हा दोनच महिन्यात बिबट्याने लहान मुलावर हल्ला केला आहे, हे विसरता येत नाही. किरपे येथील मुलावर हल्ला झाला, त्यानंतर सापळे लावण्यात आले. पण तरीही ऊस तोडणी कामगारांच्या शेळीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार मारले आहे. त्यामुळेच सध्यस्थितीत ऊस तोडणी कामगारांची भीती रास्त आहे. पण, ऊस तोड वेळेत व्हावी, यासाठी संबंधित साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राचा वापर करून तोडणी करावी व शिवार मोकळा करावा, अशी मागणीही प्रज्ञा देवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुन्हा असे झाल्यास ते परवडणारे नाही

किरपे येथे राज देवकर याच्या वडिलांनी बिबट्याचा सामना करत सुटका केली आहे. तरीही राज या हल्ल्यात जखमी झाला आहे. येणके येथेही अशीच घटना घडून ऊस तोड मजुराच्या मुलाचा बळी गेला आहे. त्यामुळेच आता पुन्हा अशा प्रकारची घटना पुन्हा घडणे आम्हा ग्रामस्थांसाठी परवडणारे नाही. म्हणून कारखान्यांनी तोडणी यंत्राचा वापर करून ऊस तोड करणे गरजेचे बनले आहे, असे सरपंच प्रज्ञा देवकर यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ : सर कटा सकते हैं लेकिन! देशसेवेसाठी हात, पाय गमावलेल्या सैनिकांचा थक्क करणारा पराक्रम

Back to top button