अनिल अवचट : कार्यकर्ता लेखक | पुढारी

अनिल अवचट : कार्यकर्ता लेखक

अनिल अवचट ‘दवाखान्यातले डॉक्टर’ झाले नाहीत; पण समाजाचेच डॉक्टर झाले. समाजाने कसे वागावे, जगावे, काय पाहावे, कोणाचे अश्रू पुसावेत.. हा सगळा सल्ला ते खेळीमेळीने देत गेले. त्यांच्या पश्चात त्यानुसार डोळे उघडे ठेवून, मन संवेदनशील ठेवून जगणे आता हातात आहे.

अवचट हे व्यक्ती म्हणून भेटण्याच्या खूप आधीपासून लेखक म्हणून भेटत होते. आणीबाणीचा काळ. जयप्रकाशांची तरुणांना हाक. युक्रांदची चळवळ. संपूर्ण क्रांतीचा नारा. अशा अनेक अर्थांनी खळबळजनक काळात हा एक मराठी लेखक शक्य तेवढा नजीक जाऊन हे सगळे कार्य, त्यामागची माणसे, त्यांचे विचार आम्हा शहरी वाचकांपर्यंत पोहोचवत होता. ‘पूर्णिया’ हे 1969 मधील त्यांचे पुस्तक पहिल्यांदा आम्हा वाचकांना हलवून गेले. ‘छेद’, ‘वेध’, ‘निपाणी’, ‘हमीद’ ही सगळी पुस्तके 1980 पूर्वीची. आमची साहित्याची कल्पना बदलायला त्यांनी भाग पाडले. हे कल्पनारंजन नव्हते, हे सगळे कुणाचे तरी प्रत्यक्ष जगणे होते. हाडामासाच्या माणसांचे मातीतले संघर्ष होते. अवचट सर्व प्रकारची वणवण सोसून त्या त्या घटनास्थळी जातीने उपस्थित राहत होते आणि दिसेल ते वास्तव कागदावर टिपत होते. ते नटवून, सजवून मांडावे, हे फक्त मीच बघू शकलोय म्हणून मिरवावे, अशी कोणतीही दाखवेगिरी त्या रिपोर्ताजमध्ये नव्हती. जनहो, हे बघून खडबडून जागे व्हा, असे आवाहनही त्यामध्ये नव्हते, तरीही हे वाचणारा कोणीही मनुष्य मनोमन हलल्याशिवाय राहत नव्हता.

असे करता करता अवचट हे मराठीतले महत्त्वाचे लेखक झाले. ‘मौज’, ‘दीपावली’ आदी दिवाळी अंकांमध्ये मानाचे स्थान पटकवू लागले. दरवर्षी नवनवा आणि अनवट अभ्यास विषय हुडकण्यात माहीर झाले. विषय कोणताही असला, तरी कमालीच्या चित्रमय, ‘ग्राफिक’ वर्णनामुळे ते वाचकाला त्यात सहज सामावू लागले. एखाद्या कसलेल्या छायाचित्रकाराने कॅमेराने लाँग शॉट घेऊन हलके हलके क्लोजपवर कॅमेरा पॅन करावा तसं त्यांचू लेखन समूहापासून सुरू होऊन एखाद्या व्यक्तीवर, प्रवृत्तीवर स्थिरावायचे. विषयाचे नावीन्य, शैलीचे साधेपण, चित्रदर्शित्व आणि यामागचे कमालीचे संवेदनशील कलावंताचे मन यामुळे अवचटांना वाचल्याशिवाय आम्हाला राहावेनासे झाले ते सुमारे 1978-80 पासून. त्याच काळात त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाचे किंवा ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकाचे संपादकपदही काही काळ सांभाळल्याचे अंधुक आठवते.

1986 मध्ये येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या आवारात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुलंच्या प्रारंभिक देणगीतून सुरू झाले आणि अवचटांमधला कार्यकर्ता जास्त ठळकपणे लोकांसमोर आला. आजवर त्यांनी अभ्यासलेले प्रश्न बिहारमधल्या वंचितांचे, निपाणीच्या बिडी कामगारांचे, हमालांचे, वेश्यांचे, तमाशा कलावंतांचे, वाघ्या-मुरळींचे, देवदासींचे म्हणजेच एका अर्थाने पांढरपेशांच्या चौकटीबाहेरचे होते; पण चरस, गांजा, गर्द वगैरेंच्या व्यसनाचे प्रश्न तर शहरी, उच्चभ्रूंकडेही होते. आणि एकेका व्यक्तीला ग्रासत ते संपूर्ण कुटुंबांची वाताहत करत होते. त्यावर अवचटांनी पुस्तकंही लिहिली, कामही केले, जनजागरणही सातत्याने केले. मुक्तांगणच्या कामात मोठा वाटा त्यांच्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांचा होता. हे उभयता आणि त्यांनी गोळा केलेला मोठा परिवार असे सगळे मिळून एका मोठ्या सामाजिक समस्येशी दोन हात करत होते. अशा प्रकारे एक लेखक आणि एक कार्यकर्ता असणारे डॉ. अवचट मनोमन कलावंत होते.

बासरी वाजवणे, चित्र काढणे, फोटोग्राफी, ओरिगामी, काष्ठशिल्पकला अशा नानाविध कला त्यांना वश होत्या. हातातल्या कागदाचा ओरिगामीने उड्या मारणारा बेडूक बनवून ते क्षणात आसपासच्या पोराबाळांना हसवत, तर आर्त बासरी वाजवून रुग्णाचे मन रमवत. प्रमुख पाहुणा म्हणून व्यासपीठावर बसल्यावरही इतरांची भाषणे सुरू असताना ते हाताने चित्रं काढत किंवा ओरिगामीची करामत करत. एका झाडाच्या फांदीवर कोरीव काम करून त्यांनी स्कूटरवरून जाणार्‍या माणसाचे एक काष्ठशिल्प बनवलेले आहे. त्यात त्यांनी साधलेली लय थक्क करणारी आहे. अलीकडे कबिराच्या रचना म्हणणे, स्वतः काव्य रचणे यातही ते रमत गेले. वाढत्या वयानुसार शरीर साथ देत नव्हते. डोळे क्षीण झाले होते. विरुपाक्ष कुलकर्णी, सुमित्रा भावे अशा जवळच्या माणसांचा वियोग सोसावा लागत होता, तरीही न कुरकुरता जगण्याला सामोरे जायला हे कलावंतपणच त्यांच्या उपयोगी पडत होते. आयुष्याच्या या शेवटच्या वळणावर ‘सृष्टीत गोष्टीत’ यासारखं बालसाहित्य त्यांना लिहिता आले ते केवळ त्यांच्या निसर्गप्रेमामुळे. जवळच्या जंगलात फिरताना आपल्याला झाडांची, पक्ष्यांची, किड्यांची भाषा कळायला लागली, अशी कल्पना करून लिहिलेले ते बालसाहित्य रूढ बालसाहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. त्याने अवचटांना साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मानही मिळवून दिलेला आहे.

अन्य अगणित पुरस्कार त्यांना देशात, विदेशात मिळणे एका अर्थाने अपरिहार्यच होते. आता स्मृतिशेष उरलेल्या अवचटांना आठवायचे म्हटले, तर यातले किती, काय आठवावे, असा प्रश्न पडतो. ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘कार्यरत’, ‘धागे उभे-आडवे’, ‘स्वतःविषयी’, ‘आप्त’, ‘जगण्यातील काही’, ‘मोर’, ‘धार्मिक’, ‘छंदांविषयी’ अशा पुस्तकांच्या लेखकाला आठवावे की ओरिगामी प्रदर्शनात पोरांनाच नव्हे, तर मोठ्यांनाही थक्क करणार्‍या कलाकाराला आठवावे? की सामाजिक कामांवर पैसे खर्च करण्याऐवजी बालगंधर्व रंगमंदिर बांधायला निघालेल्या पुणे मनपाला धारेवर धरणार्‍या समाजवादी कार्यकर्त्याला आठवावे? की ‘गर्दच्या विळख्यात अडकू नका’ म्हणून तरुणांना विनवणार्‍या समाजहितैषीला आठवावे? ठरवणे कठीण पडेल. एक मात्र खरे, नियतीने अवचटांना खूप सामग्री देऊनच इथे पाठवले आणि त्यांनी त्यातले सगळे समाजाला भरभरून दिले.

अवचटांनी रुढार्थाने डॉक्टरी कधी केली नाही. ते ‘दवाखान्यातले डॉक्टर’ झाले नाहीत; पण संपूर्ण समाजाचेच डॉक्टर झाले. समाजाने कसे वागावे, जगावे, काय पाहावे, कशाकडे कमी लक्ष द्यावे, कशातून आनंद घ्यावा, कोणाचे अश्रू पुसावेत हा सगळा सल्ला ते खेळीमेळीने देत गेले. त्यांच्या पश्चात त्यानुसार डोळे उघडे आणि मन संवेदनशील ठेवून जगणे आता मराठी समाजाच्याच हातात आहे.

– मंगला गोडबोले

Back to top button