Mahabaleshwar and Panchgani : महाबळेश्वर व पाचगणी पर्यटकांसाठी खुले - पुढारी

Mahabaleshwar and Panchgani : महाबळेश्वर व पाचगणी पर्यटकांसाठी खुले

महाबळेश्वर ; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर व पाचगणी या जगप्रसिध्द पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललँड व ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिक व पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा प्रजासत्ताकदिनानिमित्त आलेल्या सुट्ट्यांनी ही दोन्ही पर्यटनस्थळे बहरणार आहेत. (Mahabaleshwar and Panchgani)

प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गटविकास अधिकारी अरूण मरभळ, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, हॉटेल व टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने पर्यटनस्थळे बंद केली होती. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणीतील विविध पॉईंटस् पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते.

पर्यटनस्थळे बंद झाल्याने यावर आधारित असलेले छोटे छोटे विक्रेते व्यापारी, व्यवसायिक, टॅक्सी-घोडे व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत व्यावसायिकांच्या शिष्यमंडळाने आ. मकरंद पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेत काही निर्बंध ठेऊन ही प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याची मागणी केली.

यावर जिल्हा पातळीवर काही निर्णय न झाल्याने आ. पाटील यांनी सचिव असीम गुप्ता यांची भेट घेत हा विषय मांडला. त्यानुसार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना गर्दीचा आढावा घेत पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकार्‍यांना याबाबत आदेशित केले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी शुक्रवारी हिरडा विश्रामगृहात विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह बैठक घेतली. त्यावेळी वेण्णालेक, ऑर्थरसीट पॉईंट, टेबल लँड ही प्रेक्षणीयस्थळे वगळता अन्य पर्यटनस्थळे खुली करण्यात आली. गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. तसे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही जाधव यांनी केले.

यावेळी सपोनि सतीश पवार, पोलिस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, अंकुश बावळेकर, असिफ सय्यद, सूर्यकांत जाधव,दिलीप जव्हेरी, जावेद खारकंडे आदी उपस्थित होते.

Mahabaleshwar and Panchgani  : हे पॉईंटस् होणार खुले….

महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंट, मुंबई पॉईंट,कॅनॉट पीक पॉईंट,विल्सन पॉईंट,प्लेटो पॉईंट किंग्स चेअर पॉईंट,लिंगमळा धबधबा तसेच प्रतापगड व तापोळा तर पाचगणी येथील पारशी पॉईंट सिडनी पॉईंट खुले करण्यात येणार आहेत. या पॉईंट्सवर प्रत्येकी 25 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. पॉईंटस्ला भेट देण्यासाठी स्थानिक टॅक्सी संघटनेच्या कार्यालयाशी साधावा लागणार आहे. पॉईंटस्वर जाताना कार्यालयाची पावती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Back to top button