कोल्हापूर : कायद्याचे रक्षकच लाचखोर | पुढारी

कोल्हापूर : कायद्याचे रक्षकच लाचखोर

कोल्हापूर : दिलीप भिसे
सरकारी कचेर्‍यांतली नोकरी म्हणजे विनासायास बक्‍कळ कमाई करून देणारी यंत्रणा… तरीही सरकारी कचेर्‍यांत क्षुल्‍लक कामासाठीही ’टेबला’ खालून दिल्याशिवाय ’वजन’ पडत नाही. किंबहुना सरकारी बाबूंच्या टेबलावरील ढिगार्‍यांनाही हात लावला जात नाही. कायद्याच्या रक्षकांकडून ’मोका’सारख्या प्रभावी अस्त्रांचा दुरूपयोग करून लाखोंची उड्डाणे पार होऊ लागली आहेत. आर्थिक पिळवणुकीचे अनुभव काही नवे नाहीत. कचेर्‍यांतल्या उलाढालीही अंगवळणी पडू लागल्या आहेत. मात्र, कायद्याच्या भक्षकांकडूनच दरोडे पडू लागले तर… ?

‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय इथं पावलो-पावली अनुभवाला येतो. तांत्रिक उणिवा, कायद्याचा बाऊ आणि कारवाईचा धाक दाखवून सामान्यांना लुटले जात आहे. जिल्ह्यात गतवर्षी लाचप्रकरणी विविध खात्यांतर्गत वरिष्ठांसह 23 सरकारी बाबू आणि 14 पंटर एसीबीच्या हाताला लागले.

पैशांसाठी राजरोस धमकावण्याचे प्रकार
पैशांसाठी राजरोस धमकावण्याचे प्रकार

5 कॉन्स्टेबल बडतर्फ, तरीही…

कोल्हापूर पोलिस दलात सरत्या वर्षात 5, नवीन वर्षारंभाला 3 असे 7 कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात सापडले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लाचखोरीच्या घटनांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. आजवर 5 पोलिसांना बडतर्फ करूनही वर्दी आणि इनामापेक्षा पैशाला सोकावलेल्या प्रवृत्तीमुळे पोलिस दलाला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. आठवड्यापूर्वी लक्ष्मीपुरीतला कॉन्स्टेबल जिग्विजय मर्दानेला एसीबीने अटक केली. पाठोपाठ एलसीबीतील दोन कॉन्स्टेबलना 10 लाखांची लाच स्वीकारताना पथकाने बेड्या ठोकल्या. कॉन्स्टेबल विजय कारंडे, किरण गावडे यांच्या कृत्यामुळे यंत्रणेची पुरती बदनामी झाली आहे.

प्रांताधिकारी, सरपंचही सापळ्यात

पंधरवड्यापूर्वी स्टोन क्रशर व्यावसायिकावरील कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान व फराळे ( ता. राधानगरी) येथील सरपंच संदीप जयवंत डवर यांना एसीबी पथकाने अटक केली. कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ ही कारवाई झाली होती. प्रथम श्रेणीतील महसूल अधिकार्‍याला त्याच्याच कार्यालयात सुट्टीच्या दिवशी अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

जानेवारी २१ ते जानेवारी २२ चा लेखाजोखा.
जानेवारी २१ ते जानेवारी २२ चा लेखाजोखा.

लाखोंची उड्डाणे !

पोलिस दलासह महसूल विभागांतर्गत लाचखोरीच्या घटना समाजातील सर्वच घटकांना आयुष्यातून उठविणार्‍या आहेत. महागाई, बेकारीसह कोरोनाच्या सावटामुळे आर्थिक उलाढाली थंडावलेल्या असताना लाचखोरीत लाखोंची उड्डाणे आश्‍चर्यकारक ठरत आहेत.

  • पैशांसाठी राजरोस धमकावण्याचे प्रकार
  • कायद्याच्या धाकाने वसूल केली जाते खंडणी

हेही वाचा; 

Back to top button