सज्जनगड येथे ५० पोती प्लास्टिक कचरा, गड संवर्धन टीमने केली स्वच्छता - पुढारी

सज्जनगड येथे ५० पोती प्लास्टिक कचरा, गड संवर्धन टीमने केली स्वच्छता

परळी (सातारा), पुढारी वृत्तसेवा: किल्ले सज्जनगडावर परळी पंचक्रोशीतील सज्जनगड संवर्धन समूहाने यावर्षीची सज्जनगड प्लास्टिक कचरा मुक्त अभियानाने सुरुवात केली. यावेळी तब्बल ५० पोती प्लास्टिक कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

गडकिल्‍ल्‍यांचे पावित्र्य राखणे हे सर्वांचे कर्तव्य मानले जाते. मात्र, अलिकडील काही वर्षांत भाविक तसेच पर्यटक हे सज्जगडावर आल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या तसेच इतर कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. या प्लास्टिकच्या कचऱ्याचे विघटन होत नसल्याने ऐतिहासिक वास्तुवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे परळी खोऱ्यातील सज्जनगड संवर्धन टीमने या नुतनवर्षाची सुरुवात सज्जनगड प्लास्टिक मुक्त अभियानाने केली आहे.

या अभियानात सज्जगडाचे महाद्वार, अंगलाईदेवी मंदिर परिसर, धाब्याचा मारुती येथील स्वच्छता करण्यात आली. यावेळी सज्जनगडावर ५० पोती प्लास्टिक कचरा गोळा झाला. यानंतर या टिमने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली.

कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे

सज्जनगडावर पर्यटक आणि भाविकांची रीघ लागलेली असते. यामुळे वाहनतळ परिसरासह सर्वत्र भागात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. ग्रामपंचायत तसेच गडावरील दोन्ही संस्थांनी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजचे असल्याचे सज्जनगड संवर्धन समूहाच्या टीमने म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button