महाराष्ट्रातील मुलींवरील अत्याचार सहन करणार नाही : चित्रा वाघ - पुढारी

महाराष्ट्रातील मुलींवरील अत्याचार सहन करणार नाही : चित्रा वाघ

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात महिलांवरील अत्याचार अन्याय वाढत असून लहान लहान मुली त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील १४ वर्षीय शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवले.  यापूर्वी चार दिवस अगोदर मालेगांवमधील आशिया नावाच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. राज्यात नेमकं चाललयं तरी काय?, असा संतप्त सवाल भाजपाच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज केला.  बोरी गावातील भिटे कुटुंबाची भेट घेतल्‍यानंतर त्‍या बोलत होत्या.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, आज मुलीच्या आई-वडिलांच्या सांत्वनासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. त्यांनी त्यांचं लेकरू गमावले आहे त्यांना आम्ही काय सांगणार आहोत. या समाजकंटकांपायी चांगल्या शिकणाऱ्या हुशार मुलीला तिचा जीव गमवावा लागला. ही घटना एका दिवसाची नाही, याला बराच कालावधी लोटला असेल. तिने अनेक गोष्टी सहन केल्या असतील. आपण म्हणतो की पोलिस पथके फिरतायेत, दामिनी पथक फिरत आहे, फ्लाईंग स्कॉड आहे, ईव टिझींग आदी पथके कुठे आहेत? असा सवाल देखील त्‍यांनी केला.

प्रश्न सोडवायला अक्कल लागते

वाघ म्हणाल्या, पोलिसांनी जर या घटनांची वेळीच दखल घेतली असती तर आज हे जीव वाचले असते. समाजाने जर दखल घेतली असती तर मुलींचा जीव वाचला असता. परंतु आज या दोन्ही घटना घडल्या आहेत.वाईट या गोष्टीचे वाटते की घसा कोरडा पडेपर्यंत महिला आणि मुलींच्या सशक्तीकरण आणि सक्षमीकरणावर बोलणारे यांना एक वाक्य देखील सांत्वन पर बोलण्याची वेळ मिळू नये? मुख्यमंत्री म्हणतात प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही! प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते. या सरकारची अक्कल कुठे खर्च झालीये हे संपूर्ण महाराष्ट्र आणि पाहिले आहे. खंडणी गोळा करणारे, गांजा बहाद्दर,गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात या सरकारची दोन वर्षात अक्कल गेली आहे असा आरोप त्यांनी केला.सरकारकडे थोडीशी अक्कल उरली असेल तर त्यांनी महिलांच्या रक्षणासाठी घालवावी असा उपरोधिक टोलाही त्‍यांनी लगावला.

यावेळी सांत्वनभेटी दरम्यान सौ.अंकिता पाटील-ठाकरे, तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार,तानाजी थोरात,भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे,मारूती वनवे,कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, यवराज मस्के,महेंद्र चव्हाण, सुनिल भिटे,ज्ञानेश्वर जोरी, पोलीस पाटील गुलाब जगताप,हनुमंतराव वाबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

Back to top button