सातारा : शिवतीर्थासाठी 3 कोटी मंजूर | पुढारी

सातारा : शिवतीर्थासाठी 3 कोटी मंजूर

सातारा : पुढारी वृत्तसेवा, पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर अर्थात शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचे काम निधीअभावी रखडले आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समिती सभेत 3 कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत आ. शिवेंद्रराजे यांनी पोवई नाक्यावरील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचा मुद्दा मांडला. निधी नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे शिवप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐतिहासिक शिवतीर्थाचे रखडलेले काम मार्गी लावणे आवश्यक आहे. कोठूनही निधी उपलब्ध करून द्या आणि शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम त्वरित मार्गी लावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजेंनी केली.

बैठकीस उपस्थित सर्व सदस्यांनी आ. शिवेंद्रराजे यांची मागणी उचलून धरली. निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे करत शिवतीर्थाच्या देखभाल दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेला जमत नसेल तर जिल्हा परिषदेकडून हा संपूर्ण परिसर सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावा, असेही आ. शिवेंद्रराजे बैठकीत म्हणाले.

यानंतर ना. पाटील यांनी शिवतीर्थ सुशोभीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी 3 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लवकरच शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ऐतिहासिक गोडोली तळे सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करून राज्याच्या पर्यटन विभागाकडे पाठवावा, अशी सूचनाही आ. शिवेंद्रराजे यांनी बैठकीत केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button