सांगलीत कारची डिकी फोडून नेकलेस लंपास | पुढारी

सांगलीत कारची डिकी फोडून नेकलेस लंपास

सांगली, पुढारी वृत्तसेवा: येथील कर्नाळ रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारची (एम.एच. 14 एचके 7134) डिकी फोडून 72 हजार रुपयांचा नेकलेस असलेली पर्स चोरट्याने पळवली. याबाबत श्वेता संदीप तनपुरे (रा. पुणे) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस आणि फिर्यादी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, येथील कर्नाळ रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात रविवारी विवाह होता. त्यानिमित्ताने तनपुरे कुटुंबिय आठ जानेवारीरोजी सायंकाळी येथे आले होते. कारच्या डिकीमध्ये त्यांनी पर्स ठेवलेली होती. सुरुवातीस कार त्यांनी कार्यालयासमोरील पार्किंगमध्ये उभी केलेली होती. रात्री त्यांना ती बाजूच्या पार्किंगमध्ये उभी करण्यास सांगण्यात आले.

दुसर्‍या दिवशी सायंकाळी कारची डिकी फोडली असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये असलेली पर्सही लंपास झाली होती. पर्समध्ये 72 हजार रुपये किंमतीचा नेकलेस होता. तो गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

कार्यालयात आणखी दोन चोर्‍या

कार्यालयात रविवारी आणखी दोन चोर्‍या झाल्या. मात्र पोलिसांचा त्रास नको म्हणून त्यांनी तक्रार दिली नाही, असे फिर्यादिनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसात मंगल कार्यालयातून चोर्‍यांचे प्रकार वाढत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button