सांगली : माणगंगा साखर कारखान्यावर तानाजी पाटील गटाची सत्ता; सत्ताधारी गटाची धक्कादायक माघार

सांगली : माणगंगा साखर कारखान्यावर तानाजी पाटील गटाची सत्ता; सत्ताधारी गटाची धक्कादायक माघार

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनपेक्षित निर्णय घेत सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, तानाजीराव पाटील गट प्रथमच सत्तेत आला. पाटील यांचे थोरले बंधू शिवाजीराव पाटील बिनविरोध निवडून आले.

माणगंगा साखर कारखाना गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. थकित कर्जामुळे जिल्हा बँकेने ताब्यात घेतला आहे. या कारखान्याची निवडणूक भाजप आणि शिवसेनेत होईल अशी अपेक्षा होती. वरिष्ठ पातळीवरील हालचाली होऊन दोन्ही गटात समझोता होईल अशी अपेक्षा होती. परंतु देशमुख गटाने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

तानाजीराव पाटील यांना सांगोला तालुक्यातील आमदार शहाजी बापू पाटील, दीपक आबा साळुंखे, ॲड.बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तानाजीराव पाटील, शेकापचे दादासो बाबर, आबा बनगर, शहाजी औताडे, नारायण पाटील व सहकाऱ्यांनी पाठींबा दिला होता. चर्चेनंतर तानाजीराव पाटील यांनी आटपाडी तालुक्याला १३ आणि सांगोला तालुक्याला ४ जागा देण्याचे निश्चित केले.

दरम्यान माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अचानक सर्व अर्ज मागे घेत आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे कारखान्यात प्रथमच सत्तापालट झाला. शिवसेना आणि सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय आघाडीचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.

निवडणूक बिनविरोध झाल्यावर श्रीराम बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेत नूतन संचालकांच्या सत्कारप्रसंगी तानाजीराव पाटील म्हणाले, बंद पडलेला साखर कारखाना सुरू करण्याचा आराखडा आम्ही मतदारांच्या समोर मांडला. जे बोलतो ते मी करून दाखवतो या भूमिकेवर सभासदांनी आणि विरोधकांनी देखील विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ ठरवेन अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, माणगंगा साखर कारखाना चालवताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. माझ्यावर विश्वास असल्याने ऊस कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. माणगंगा ताब्यात आला तरी कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नका. कारखाना सुरू करून सभासदांना प्रत्यक्ष साखर पोहोचवल्यावरच जल्लोष करा असे आवाहन त्यांनी केले.

तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब :

जिल्हा मध्यवर्ती बँक, मजूर फेडरेशन, बाजार समिती पाठोपाठ माणगंगा साखर कारखाना या सलग चार निवडणुकीत तानाजीराव पाटील यांनी देशमुख गटाला जोरदार धक्का दिला. तानाजीराव पाटील यांनी तालुक्यावरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे.

नूतन संचालक खालीलप्रमाणे :

शिवाजी भगवान पाटील, जगन्नाथ आनंदा लोखंडे, कुंडलिक आनंदा सलगर कोळे, अनिल बाबा कदम, कृष्णा रामचंद्र गायकवाड, सागर बाळासो ढोले, बाळू भिमराव मोरे, तातोबा आप्पासाहेब पाटील, नाना नामदेव बंडगर, सुरेश पांडूरंग जरे, दादासो बयाजी वाघमोडे, पांडूरंग विठ्ठल पिसे, रमेश शिवाजी हातेकर, उज्वला जालिंदर नवले, रतन वसंत मोरे, रामेश्वर ज्ञानु खिलारी, ब्रम्हदेव ज्ञानु व्हनमाने

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news