पुढारी ऑनलाईन डेस्क : India GDP : सरत्या आर्थिक वर्षात 7.2 टक्के इतक्या जीडीपी दराची नोंद झाली असल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) बुधवारी देण्यात आली. तत्पूर्वीच्या म्हणजे वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी दर 9.1 टक्के इतका नोंदवला गेला होता. सरकारकडून जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीचे आकडेही जाहीर करण्यात आले असून या तिमाहीत जीडीपी दर 4.4 टक्क्यांच्या तुलनेत 6.1 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
सरत्या आर्थिक वर्षात जीडीपी दर साडेसहा टक्क्यांच्या आसपास राहील, असे भाकीत रिझर्व्ह बँकेने वर्तवले होते. त्या तुलनेत जीडीपीचे आकडे चांगले आल्याचे मानले जात आहे. चौथ्या तिमाहीत जीडीपी दर साडेपाच टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अर्थतज्ञांचा अंदाज होता. तथापि हे आकडेही समाधानकारक आले आहेत. दरम्यान प्रती माणशी उत्पन्न आर्थिक वर्ष 2022 मधील 92 हजार 583 रुपयांच्या तुलनेत 98 हजार 374 रुपयांपर्यंत वाढले असल्याचेही एनएसओच्या अहवालात म्हटले आहे.
सरत्या आर्थिक वर्षात देशाचे एकूण उत्पन्न 136.04 लाख कोटी रुपये इतके होते. तत्पूर्वीच्या वर्षात हेच उत्पन्न 126.71 लाख कोटी रुपये इतके होते. संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर निर्मिती क्षेत्राचा विकासदर 11.1 टक्क्यांच्या तुलनेत 1.3 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. खाणकाम आणि उत्खनन क्षेत्राचा विकासदर वर्ष 2022 मधील 7.1 टक्क्यांच्या तुलनेत 4.6 टक्के इतका नोंदविला गेला. वीज, वायू, पाणीपुरवठा व इतर युटिलिटी क्षेत्राचा निर्देशांक 9.9 टक्क्यांच्या तुलनेत 9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
बांधकाम क्षेत्राचा निर्देशांकदेखील 14.8 टक्क्यांवरून घसरून 10 टक्क्यांवर आला आहे. लोक प्रशासन, संरक्षण व इतर सेवा या क्षेत्राचा निर्देशांक 9.7 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. मार्च तिमाहीचा विचार केला तर या तिमाहीत निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक 1.1 टक्क्यांच्या तुलनेत 4.5 टक्क्यांवर गेला आहे. याच काळात कृषी क्षेत्राचा विकासदर 3.7 टक्क्यांच्या तुलनेत 5.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
प्रतिकूल जागतिक परिस्थिती असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या आर्थिक वर्षात चमकदार कामगिरी केली. बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जीडीपी वाढीचा दर अंदाजापेक्षा चांगला राहिला आहे. आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था मार्च तिमाहीत 6.1 टक्के दराने वाढली, तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7.2 टक्के होता.
जानेवारी-मार्चमध्ये कृषी क्षेत्राची वाढ चांगली झाली. या कालावधीत GVA (ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड) 5.5 टक्के, डिसेंबरच्या तिमाहीत तो 4.7 टक्के, 2022 च्या पहिल्या तिमाहीत तो 4.1 टक्के होता. मार्च तिमाहीत जीडीपीच्या चांगल्या वाढीमध्ये उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या क्षेत्राचा GVA वार्षिक आधारावर 4.5 टक्क्यांनी जास्त होता. मागील दोन तिमाहीत या क्षेत्राची वाढ नकारात्मक होती. जुलै-सप्टेंबरमध्ये त्यात 3.8 टक्क्यांची घसरण झाली होती. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 1.4 टक्क्यांची घसरण झाली.