सांगली : सहा नगरपालिका निवडणुकांचा बिगुल

सांगली : सहा नगरपालिका निवडणुकांचा बिगुल

सांगली : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत संपणार्‍या 6 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाने मागविला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील विटा, आष्टा, तासगाव, इस्लामपूर, जत आणि पलूस नगरपालिकांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा विषय यामुळे पालिकांच्या निवडणुका मुदतीत झाल्या नाहीत. मुदत संपलेल्या पालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मंगळवारी निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निवडणुकांसाठी दि. 2 मार्च रोजी नगरपालिकांनी जिल्हाधिकार्‍यांना प्रभाग रचनेचा आराखडा सादर करायचा आहे. त्यानुसार दि. 10 रोजी हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. दि. 5 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना निश्‍चित करण्यात येणार आहे.

नवीन नियमानुसार प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथे दोन परिषद सदस्य, परंतु तीनपेक्षा अधिक नाहीत इतके सदस्य निवडून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे व त्यावर सुनावणी इत्यादींबाबत कार्यवाही करण्यासाठी आयोगाने सूचना दिल्या आहेत. निवडणुकीचा प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकासांठी सन 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यावरील माहिती नगरपालिका आणि नगरपरिषदांनी तातडीने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. नगरपालिकांचा प्रारूपप्रभाग रचनेचा आराखडा सहाही मुख्याधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 2 मार्च रोजी द्यावयाचा आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून 7 मार्च रोजी त्याला मान्यता देण्यात येईल. त्यानंतर आरखड्यावरील हरकती आणि सूचनांसाठी ही यादी दि. 10 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 17 पर्यंत हरकती घेण्यात येवून दि. 22 मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल. हरकती, सूचना आणि सुनावणी दरम्यान देण्यात आलेल्या दुुरुस्तीनंतर दि. 1 एप्रिल रोजी निवडणुकांसाठी अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून दि. 5 एप्रिल रोजी मान्यता दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राजकीय हालचालींना वेग

नगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच गटांनी आतापासून जोर लावला आहे. काही ठिकाणी प्रभाग आणि सदस्यांची संख्यादेखील वाढणार आहे. तासगाव, इस्लामपूर, आष्टा, विटा, जत आणि पलूस या नगरपालिकांमध्ये सत्तेसाठी जोरदार लढत होणार आहे. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे.त्या दृष्टीने आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news