सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे गद्दार दिवस आंदोलन

सांगली
सांगली

सांगली; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राज्यामध्ये आजचा दिवस हा ' गद्दार दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सरकारचा निषेध व्यक्त करीत सांगली जिल्हयात आज आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज एक वर्ष पूर्ण झाले. खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त आज राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून 'गद्दार दिवस' साजरा करण्यात आला.

खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे, असा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी 'आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी.., चले जाव-चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव.., महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त.., पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…, गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!, महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार.., खोके सरकारचा चालणार नाही थाट-गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट…, पन्नास खोके, गद्दार 'Not' ओके…, खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय…अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी सांगली शहराध्यक्ष सागर घोडके , तानाजी गडदे ,उत्तम कांबळे ,स्वाती पारधी, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे ,वैशाली कळके ,ज्योती अदाटे, छाया जाधव , समीर कुपवाडे आदी उपस्थित होते.

विट्यात जागतिक गद्दार दिन साजरा

राज्यातील ४० गद्दार आमदारांना मत पेटीरुपी कड्यावरून ढकलून द्या आणि त्यांचा कायमचा कडेलोट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने जनतेला केले. आज (२० जून), राज्यात महाविकास आघाडीची फारकत घेऊन शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व व्हाया सुरत, गुवाहाटी मार्गे स्विकारले, तो हा दिवस. त्या दिवसाची आठवण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आज विट्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, विधानसभा क्षेत्राधिकारी सुशांत देवकर, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा सरचिटणीस संदीप मुळीक, अविनाश चोथे 'जागतिक गद्दार दिन' साजरा केला.

सत्ताधाऱ्यांचे जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एरवी पाच दिवस पाऊस पडला तरी ओला दुष्काळ जाहीर केला जातो. मात्र गेल्या महिना भरात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा थेंब नाही. जून महिना पूर्ण होत आला तरी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. रोज कुठे ना कुठे खून, मारा माऱ्या, अत्याचार सारख्या घटना घडत आहेत, धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक वातावरण पूर्णपणे गढूळ बनविले जात आहे.

जनता संतापलेली आहे, त्यावर उतारा म्हणून कुठले तरी सर्व्हे सांगून आपणच कसे लोकप्रिय आहोत, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जर एवढेच लोकप्रिय आहात तर निवडणूका घ्यायला का घाबरताय ? असा सवाल देखील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. यावेळी राष्ट्रवादी वक्ता सेलचे अध्यक्ष संतोष जाधव यांचेही भाषण झाले. यावेळी हर्षवर्धन बागल, मनोहर चव्हाण,महेश फडतरे, विकास माने, शाहरुख पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

इस्लामपूर येथेही गद्दार सरकारचा निषेध

राज्याच्या गद्दार सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथील कचेरी चौकात गद्दार सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ५० खोके,एकदम ओके;खोके सरकार हाय-हाय आदी घोषणां नी परिसर दणाणून सोडला.

ज्यांना रिक्षा ड्रायव्हरचा राज्याचा मंत्री केले,त्या पक्षाशी आणि नेतृत्वाशी जे प्रामाणिक राहिले नाहीत, ते राज्यातील जनतेशी कसे प्रामाणिक रहाणार? जे हिंदुत्वाची भाषा करून सत्तेवर आले,त्यांनी गेल्या एक वर्षात हिंदूंच्यासाठी विशेष काय केले?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी यावेळी केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news