

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यात जागेच्या वादावरून थेट पिस्तूल लावून मारहाण केल्याप्रकरणात विटा पोलिसांनी शहानिशा करून गुन्हे दाखल केले पाहिजे होते. मात्र, कोणाच्या तरी दबावाखाली ते काम करीत आहेत, असा आरोप बांधकाम व्यावसायिक प्रकाश खेराडकर यांनी आज (दि. १) पत्रकार परिषदेत केला आहे.
विट्यात जागेच्या वादावरून शुक्रवारी (दि.३१) एकास मारहाण झाली. यात संशयितांनी थेट डोक्याला पिस्तूल लावून आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली असे संबंधित फिर्यादीदार हर्षवर्धन कृष्णा जाधव (रा शाहूनगर, विटा) याने म्हटले आहे. शिवाय ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या घरासमोर घडली, असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
त्यावरून पंकज जोतीराम दबडे, हर्षल निकम, अभि शिंदे, ओंकार साळुंखे, धनाजी जाधव, समराय तंबुगे (रा. सर्व विटा) तसेच अनोळखी तीन महिला अशा एकूण ९ जणांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, याबाबत आज प्रकाश खेराडकर यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. गुरुवारी सायंकाळी ६: ५० वा ते ७:३० पर्यंतचे पंकज दबडे, हर्षल निकम, अभी शिंदे ओंकार साळुंखे, धनाजी जाधव आणि समराय तंबुगे यांचे सीसीटीव्हीचे फुटेज त्यांनी सादर केले.
यात त्यांचा सहकारी आणि संशयित पंकज दबडे सायंकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान त्यांच्या पतसंस्थेत होता. हर्षल निकम हे त्यांच्या घरी होते. तर समराय तंबुगे हे विजापूरच्या एका टोल नाक्यावर गाडीतून जात होते. तर अन्य एक जण हॉटेलसमोर मित्राशी बोलत होते. तर एकजण पिग्मी गोळा करत असताना दिसत आहे.
यावरून पोलिसांनी केवळ कोणाच्यातरी दबावापोटी हर्षवर्धन जाधव यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे, असा आरोप खेराडकर यांनी केला आहे. पंकज दबडे हे प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांच्याशी आमची व्यावसायिक भागीदारी असून बांधकामांची कंत्राटे आम्ही घेत असतो. जिथे घटना घडली, त्या शाहूनगरमध्ये एका ठिकाणी आमचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणच्या जागेशेजारी हर्षवर्धन जाधव यांचे घर आहे. तेथील जागा मालक आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात जागेबाबत कसलाही वाद नाही.
या उलट आम्ही बांधकाम करत असलेल्या जागेच्या मालकाबरोबर करार करताना हर्षवर्धन जाधव याने तिथे त्याच्या घराला काही धोका उत्पन्न झाल्यास त्याची भरपाई दिली जाईल, असे नमूद केले आहे. त्यामुळे आम्ही हर्षवर्धन जाधव यांच्याशी वादविवाद अथवा भांडण करण्याचा कोणताही मुद्दा येत नाही. त्यामुळे पोलिसांनी शहानिशा करून गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, असेही खेराडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा