सांगली: विट्यात जागेच्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून मारहाण: ९ जणांवर गुन्हा

विटा: पुढारी वृत्तसेवा: विटा येथे जागेच्या वादावरून थेट डोक्याला पिस्तूल लावून एकास मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच घटनेतील मारहाण झालेल्या तरुणाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. हर्षवर्धन कृष्णा जाधव (रा. शाहूनगर, विटा) याने फिर्याद दिली आहे. तर हर्षवर्धन जाधव विरूध्द जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सतिश बाबासो पालवे (वय ३४, कातरखटाव, ता. खटाव, जि. सातारा, सध्या आंबेडकरनगर, विटा ) या तरूणाने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जाधव याच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम सुरू आहे. तुम्ही तुमच्या जागेतील हद्दीत बांधकाम करा, असे ते सांगत असताना पंकज दबडे, हर्षल निकम, अभि शिंदे यांनी स्वत: जवळील पिस्तूल जाधव याच्या डोक्या ला आणि छातीवर लावून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच जाधव याच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पंकज जोतीराम दबडे, हर्षल निकम, अभि शिंदे, ओंकार साळुंखे, धनाजी जाधव, समराय तंबुगे (सर्व रा. विटा) तसेच अनोळखी तीन महिला (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही ) अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तर हर्षवर्धन जाधव याने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत सतिश बाबासो पालवे यांनी फिर्याद दिली. पालवे हा गुरूवारी रात्री सातच्या सुमारास चारचाकी (एम. एच.०९, सी. ओ. ०९०३) मधून विट्यातील विवेकानंदनगरात पंकज दबडे यांच्या बांधकामांवर रेडीमेड क्राँक्रीट पोहोच करण्यासाठी गेला होता. यावेळी हर्षवर्धन जाधव याने पालव याच्या गाडीच्या केबीनच्या काचा फोडून ४० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच या जागेचा वाद माझ्याशी चालू आहे. तू इथे गाडी घेवून का आलास, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. पुढील तपास विटा पोलीस करत आहे.
हेही वाचा
- सांगली : नागराळेत युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला, युवक गंभीर; पाच जणांना अटक
- सांगली: विटा येथे फ्लेक्स फाडल्याप्रकरणी ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांची निदर्शने
- सांगली : सात बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा