

Dhairyashil Kadam
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपने रविवारी रात्री आपल्या ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम आणि सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना संधी देण्यात आली आहे. वर्धा गडचिरोली-चंद्रपूरमधून राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नागपूर पोटनिवडणुकीसाठीही डॉ. राजीव पोतदार यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या १७ जागांसाठी गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. विशेषतः महायुतीतील जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच झाली. अखेर रविवारी महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीने अत्यंत गोपनीयता पाळली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असून ऐनवेळी पक्षातर्फे उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्यापैकी एक नाव अंतिम केले जाणार असल्याची चर्चा रविवारी सुरू होती. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्याकडे एबी फॉर्म तयार होते. मात्र रात्री उशिरापर्यंत कुणाला एबी फॉर्म द्यायचा याबाबत त्यांना सूचना झाल्या नव्हत्या
वर्धा विधान परिषद मतदारसंघातून अरुण लखानी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. लखानी हे शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. आपल्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी अलीकडेच सुप्रिया सुळे आणि अरुण लखानी यांनी एकत्रपणे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.