‌NCP funding issue : ‘राष्ट्रवादी‌’च्या अनेक नेत्यांनी पक्षाला दिलेली रक्कम बुडाली!

मराठवाड्यात आजी-माजी आमदारांना आर्थिक फटका
NCP funding issue
NCP funding issuepudhari photo
Published on
Updated on

संजीव कुळकर्णी

नांदेड ः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पक्ष निधीसाठी पक्षाच्या मंत्र्यांना दिलेल्या आदेशामुळे पक्षातील वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच या पक्षाचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या आदेशावरून मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी पक्षासाठी केलेल्या खर्चाची मोठी रक्कम बुडाल्यात जमा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार यांचे गेल्या जानेवारी महिन्यात निधन झाल्यानंतर या पक्षामधील अंतर्गत वाद समोर येण्यास सुुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व खा. प्रफुल्ल पटेल विरुद्ध अजितदादांचा गट असे या पक्षातील स्वरूपही समोर आले. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत बरीच खडाजंगी झाली. त्याची काही माहिती बाहेर आली.

NCP funding issue
खा. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य !

दिवंगत अजितदादांच्या सांगण्यावरून मराठवाड्यामध्ये पक्षाच्या ज्या आमदार व नेत्यांनी नगर परिषदा, नगरपंचायती, मनपा इत्यादी निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी जी रक्कम लावली ती त्यांना नंतर परत मिळाली नाही आणि आता कोणाकडे मागण्याची सोयही राहिलेली नाही. त्यामुळे काही नेते अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले.

पक्षाच्या मराठवाड्यातील एका विधान परिषद सदस्याला अजित पवार यांनी नगरपालिका निवडणुकीतील पक्षाच्या काही ठिकाणच्या उमेदवारांना रसद पुरवण्याची सूचना दिली होती. या आमदाराने त्यानुसार आपली जबाबदारी पार पाडली; पण आता ती रक्कम मिळण्याची सोय राहिलेली नाही. नांदेड जिल्ह्यातील एका नेत्यानेही दोन नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी सुमारे दोन कोटी रूपयांची सोय करून दिली होती. या नेत्यावरही आता हात चोळत बसण्याची वेळ आली असल्याचे या नेत्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील पक्ष विस्ताराला मोठी चालना दिली होती. पवारांच्या तीन-चार दौऱ्यांमधून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यात माजी आमदारांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. एका माजी आमदारास महामंडळातील चांगले पद देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार या माजी आमदाराने आवश्यक तो पक्षनिधी पवारांच्या एका स्थानिक निकटवर्तीयामार्फत पक्षाकडे सुपूर्द केला होता; पण त्याची योग्य ती नोंद झाली नसल्यामुळे या माजी आमदाराची कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार यांनी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासनही शेवटच्या नांदेड दौऱ्यात दिले होते. प्रमुख कार्यकर्त्यांची चांगल्या पदांवर वर्णी लावण्यासाठी पक्षाकडे बराच निधी गेला होता; पण पवारांच्या हयातीत कोणाचेही राजकीय पुनर्वसन होऊ शकले नाही आणि आता पक्षातील एकंदर अनागोंदीमुळे पक्षासाठी आर्थिक गुंतवणूक करून बसलेले नेते-कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी विवंचनेत असल्याचे सांगण्यात आले. अर्थखाते आता पक्षाकडे नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांना गेल्या सहा महिन्यांत जबर फटका बसला असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

NCP funding issue
Legislative Council Elections | युतीत आवाज कुणाचा?
  • काँग्रेसकडून आमदार राहिलेल्या जिल्ह्यातील एका नेत्याने सर्वांत आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नेत्याच्या सूतगिरणीला मोठी आर्थिक मदत देण्याचा विषय अजित पवार यांना सांगण्यात आला होता. त्यासाठी या माजी आमदाराने सातत्याने मुंबई वाऱ्या करून पाठपुरावा चालवला होता; पण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर या सूत गिरणीच्या आर्थिक मदतीचा विषयसुद्धा लटकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news