

मृणालिनी नानिवडेकर
विधान परिषद निवडणुकीने महायुतीतच अंतर्गत संघर्षाला तोंड फोडले आहे. जागावाटप, राजकीय वर्चस्व आणि घराणेशाहीमुळे भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच नव्या सत्तासंघर्षाचे रूप घेताना दिसत आहे.
निवडणुकांच्या धारावाहिकांत आताचा एपिसोड स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडून पाठवावयाच्या आमदारांचा आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा मुहूर्त एक जूनचा असल्याने बाजार तेजीत आहे. 17 आमदार निवडायचे आहेत अन् सत्राशेसाठ इच्छुक आहेत. 17 पैकी एकाही ठिकाणी विरोधकांकडे संख्याबळ नाही. विस्कळीत झालेली महाविकास आघाडी एकत्र आली तरी कुठेही ते निवडून येऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. पण तरीही निवडणूक तेजीत आहे. या तेजीमागचे एकमेव कारण आहे सत्ताधारी पक्षात आपापसात सुरू असलेली सत्तास्पर्धा.
यातील एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्व ठिकाणी भाजप मोठा आहे. पण त्याच्या पाठोपाठ आहे तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना. मित्र असले, युतीत नांदत असले तरी शेवटी राजकारणी ते राजकारणी. ‘खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख’ हे राजकारण्यांसाठीच लिहिलेय जणू. त्यामुळे भाजपने 17 पैकी 12 मतदारसंघांवर केलेला दावा शिंदे सेनेला मान्य नाही. पूर्वी शिवसेनेकडे यातल्या पाच जागा होत्या, त्यामुळे या पाच किंवा दुसर्या पाच जागा हव्यात असा त्यांचा आग्रह आहे. राजकारणात हातचे काही सोडायचे नसते, ते राखून पळत्याच्या मागे लागायचे असते हे अल्पावधीत महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रिय झालेले एकनाथ शिंदे जाणतात.
2022 सालापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने रखडलेल्या या निवडणुकातल्या पाच मतदारसंघांत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्यांचे पाच आमदार होते. काळ अंमळ जुना, तेव्हा सेना फुटली नव्हती. ठाणे (रवींद्र पाठक), संभाजीनगर (अंबादास दानवे), नाशिक (नरेंद्र दराडे), यवतमाळ (दुष्यन्त चतुर्वेदी) आणि परभणी (विप्लव बजोरिया) असे ते पंच प्यारे. आता संभाजीनगर - जालना, नाशिक, यवतमाळमध्ये शिवसेनेकडे बहुमत नाही आणि काही आक्रमक भाजपवाल्यांच्या म्हणण्यानुसार ठाण्यातही नाही. तरीही शिंदेंनी आणखी दोन अधिकच्या जागा मागत सातचा आकडा भाजपसोबतच्या समन्वय समितीच्या बैठकीत सांगितला आहे.
भाजपकडे जागा जिंकण्याचे आकडे आहेत, घोडेबाजार झाला, मते विकत घ्यावी लागली तर ते करण्याची सर्वाधिक क्षमताही आहे. मात्र तरीही भाजप असे शक्तीचे प्रयोग न करता चुचकारून घेण्याच्या मनःस्थितीत आहे. आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगर आणि नाशिक या जागांबाबत सेनेची मागणी आहे, तोडगा निघायचा आहे, हे जाहीर वक्तव्य केले. त्यामागचे कारण सरकार चालवताना वाद, मनभेद नकोत हे आहेच; पण आकडेही बोलके आहेत. तेथे भाजपशी हात मिळवता आले नाहीत तर शिवसेना शिंदे गट अन्य पक्षांना मदतीला घेऊन आगळीक करू शकते. त्यामुळेच सावध राहणे आवश्यक आहे. शिवाय युतीचा संसार केवळ दोघांचा नाही, त्यात तिसरा पक्षही आहेच.
नेता अकाली गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. पण पूर्वीचे बलाबल पाहिले तर पुणे (अनिल भोसले), अहिल्यानगर (अरुणकाका जगताप) आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अनिकेत तटकरे) अशा तीन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. आता पुण्यात भाजप पुढे गेल्याने हा मतदारसंघ सोडायची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी बर्यापैकी वाजले. त्यामुळे मने दुभंगली. ती सांधली गेली नसतानाच कदाचित अजित पवारांचे धाकटे समजूतदार चिरंजीव जय पवार यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव समोर येईल. तशा हालचाली सुरू आहेतच. भाजपला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तशी इच्छा व्यक्त केली तर त्यांना दुखवायचे की नाही हे ठरवावे लागेल. घराणेशाहीचा आरोप होऊ नये यासाठी त्यांना जागा दिली, तर पुढचा निर्णय त्यांचा, असा पवित्रा घेता येईल. पण पवार घराण्यातले किती चेहरे पुढे येऊ द्यायचे, असा तिढा असेल तर जागा द्यायची नाही, असा मार्ग स्वीकारावा लागेल.
पुण्यापेक्षा कठीण विषय रायगडचा. ही जागा तटकरे कुटुंबाला वर्चस्वासाठी हवी तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला रायगड आमचेच हे सांगण्यासाठी हवी. पालकमंत्रिपद दोन सहकारी पक्षाच्या वादात कुणाला सोपवता आलेले नाही. जागा सेनेला द्यावी अन् पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला असा प्रस्ताव आहे अन् उलटा पर्यायही आहे. आदिती तटकरे भावासाठी पालकमंत्रिपद सोडतात का, सोडायचे ठरवले तरी अनिकेत यांची उमेदवारी तटकरे यांच्या विरोधात गेलेला पार्थ-जय यांच्या हातातला राष्ट्रवादी पक्ष मान्य करतो का, हे मुद्दे आहेतच. या सगळ्या जर-तरमुळे संख्या असतानाही युतीचे नेते परस्परांच्या भेटीगाठी घेत आहेत.
शिंदेसाहेब तर दिल्लीदरबारी न्याय मागायला गेले आहे म्हणतात. शिंदे शिवसेनेला मुंबई महापालिकेत विशेष यश न लाभल्याने नाराज झालेल्या भाजप श्रेष्ठींचे मन द्रवते का? कृपामेघ बरसतो का ते आता बघायचे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांची जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची चिवट धडपड आणि शिंदे यांचा मेहनती स्वभाव ही शत-प्रतिशत भाजपसमोरची आव्हाने आहेत. शिवसेना असो किंवा आपापसातल्या वादात अडकलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख या नात्याने फडणवीस यांना हा वाद येत्या आठवड्यात सोडवायचा आहे. त्यांची कृष्णनीती या वेळी कशी काम करते ते पाहायचे!
विरोधी ऐक्य बघूया..
या 17 जागांच्या महाभारतात नांदेडसारख्या काही जागांवर काँग्रेसच्या जागा बर्या आहेत. निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी आपला प्रतिनिधी निवडून देतात. चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधीही लक्ष्मीदर्शन झाले तर निष्ठा बदलतात, घोडेबाजार होतो हा आजवरचा अनुभव. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 100 कोटींची उलाढाल सुरू असल्याचा आरोप करून राळ उडवायचा प्रयत्न सुरू केला आहेच. मात्र त्याचवेळी सत्ताधारी आघाडीतील बेबनावाचा योग्य उपयोग करून मविआ एखाद्या ठिकाणी तरी काही चमकदार करते का ते पाहायचे. हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्या दमाचे अध्यक्ष जिल्हाजिल्ह्यात नेमले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या प्रवासामुळे बातमीत असतो. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विस्तारासाठी मेहनत केव्हा सुरू करणार हे पाहणे मोलाचे आहे.
बाय द वे, मुंबई महापालिकेतील भाजप सरकारने पहिल्या 100 दिवसांत काय केले याचा लेखाजोखा मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे यांनी मांडला. खरेच काही घडले आहे का, त्याबद्दल लवकरच माहिती समोर येईल. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर झुरळ नावाने सुरू केलेला पक्षही लोकप्रिय होतो आहे. सत्ताधारीच नव्हे तर सर्व प्रचलित पक्ष हे लक्षात घेत असतीलच.