सांगली : काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ; चौरंगी लढतीचे संकेत - पुढारी

सांगली : काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ; चौरंगी लढतीचे संकेत

सांगली : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणुकीसाठी चौरंगी लढतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ झाली आहे. भाजप आणि शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीकडून मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे संकेत मिळत आहेत.

पोटनिवडणुकीसाठी 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बुधवारी राजकीय हालचाली गतिमान झाल्या. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार यांच्याशी संपर्क साधून बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केले.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असा पवित्रा शिंदे व इनामदार यांनी घेतला. दरम्यान, भाजपचा अर्ज माघारीसाठी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादी अर्ज मागे घेणार

राष्ट्रवादीचे उमेदवार उमर गवंडी यांचा उमेदवारी अर्ज गुरूवारी मागे घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याशी चर्चा केली आहे.

काँग्रेसचे सेना नेत्यांना आवाहन

पृथ्वीराज पाटील यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बाणुगडे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत आवाहन केले. दरम्यान, शिवसेना वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे महापालिका उपप्रमुख शंभोराज काटकर यांनी शिवसेना लढणार असल्याचे सांगितले.

बिनविरोधची आशा मावळली?

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना व अपक्ष अशी चौरंगी लढत होईल, असे संकेत राजकीय गोटातून मिळत आहेत.

बंडखोरीने काँग्रेसची गोची

काँग्रेसचे सुरेश सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र निवडणूक लढविण्याचा त्यांचा पवित्रा कायम आहे. तसे स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेले आहेत. काँग्रेसमध्येच बंडखोरी झाल्याने बिनविरोध निवडणुकीसाठी अन्य पक्षांना आवाहन करताना काँग्रेसची गोची झाली आहे. तरिही बिनविरोधसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरूच आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button