Nashik News | कांदा निर्यातबंदीविरोधात आवाज उठविणार – खासदार भास्कर भगरे

Nashik News | कांदा निर्यातबंदीविरोधात आवाज उठविणार – खासदार भास्कर भगरे

[author title="नाशिक : गौरव जोशी " image="http://"][/author]
जिल्ह्यातील कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, संकटाच्या याकाळात त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी दिल्लीत आवाज उठविणार असल्याची माहिती दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली. मतदारसंघातील शेती, वळण योजनांसारखे प्रकल्प आपल्या अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले खा. भगरे यांनी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेताना ज्वलंत व प्रलंबित प्रश्नांचा प्राधान्यक्रम त्यांनी ठरविला आहे. यात कांदा प्रथम प्राधान्य असल्याचे भगरे यांनी सांगितले. केंद्रामध्ये आपल्या विचारसरणीचे सरकार स्थापन झाले असते तर सर्वप्रथम निर्यातबंदी उठविली असती. पण, शासन आपले नसले तरी सत्ताधाऱ्यांनाही कांद्याचे महत्त्व समजले असेल अन् लक्षात आले तरी येत्या काळात संसदेत आपण त्याची तीव्रता दाखवून देऊ, असे भगरे यांनी स्पष्ट केले.

खा. भगरे म्हणाले, गोदावरी व गिरणा या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर दिंडोरी मतदारसंघ विस्तारला आहे. पश्चिम वाहिन्यांना वाहून जाणारे पाणी अडवून ते वळण योजनांमार्गे गोदावरी व गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी प्रयत्न असणार आहे. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यांमधील आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी शेती हा एकमेव पर्याय आहे. त्या अनुषंगाने शेतीला पाणी देण्यासह कांदा व द्राक्षावर आधारित प्रक्रिया उद्याेग उभे करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पेठ तसेच दिंडोरीत एमआयडीसी मंजूर झाली आहे. परंतु, अद्यापही त्याच्या कामास प्रारंभ झाला नाही. या औद्योगिक वसाहती सुरू झाल्यास आदिवासी पट्ट्यात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे शासनदरबारी एमआयडीसीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे भगरे यांनी सांगितले.

ड्रायपोर्टसाठी प्रयत्न

निफाड येथील प्रस्तावित ड्रायपोर्टला मंजुरी मिळाली असून, निधीदेखील उपलब्ध झाला आहे. पण, त्याचे पुढील काम कोठे अडले याचा शोध घेणार आहे. प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर सारताना शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ड्रायपोर्ट तातडीने खुले करण्याचा प्रयत्न असेल, असे खा. भगरे यांनी सांगितले. मतदारसंघात आरोग्य व शिक्षणाचा प्रश्नावर म्हणावे तसे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे येत्या काळात हे मुद्दे हाती घेऊन ते तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

नाशिक-कळवण चौपदरीकरण

नाशिक-दिंडोरी-कळवण या महामार्गावर वाहतूक वाढली आहे. त्या तुलनेत सध्याच्या महामार्गाची क्षमता कमी आहे. त्यामुळे सर्वप्रथम या महामार्गाचे चौपदरीकरण करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर करणे हे आपल्या अजेंड्यावर आहे. निफाड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम १० वर्षांपासून रखडले आहे. हे काम तत्काळ मार्गी लावताना निफाडवासीयांना दिलासा देणार, अशी माहिती खा. भगरे यांनी दिली.

रेल्वे समस्यांवर काम

कोरोनानंतर नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेगाड्या अन्यत्र पळविल्या गेल्या. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचा प्रश्न कायम आहे. तसेच नांदगाव, लासलगाव येथे अनेक रेल्वेचे थांबे बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेच्या या समस्या घेऊन दिल्लीत लढा तीव्र करणार असल्याचे संकेत खा. भगरे यांनी दिले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news