सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी एका कॉलेज तरुणास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने काठी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. असेच खुनी हल्ल्याचे तीन प्रकार दोन महिन्यात कॉलेज कॉर्नर जवळील एका महाविद्यालयात आणि विश्रामबाग चौकातील एका महाविद्यालयाच्या आवारात झाले. त्यावरून शहरातील कॉलेज हे गुंडांचे अड्डे बनू लागल्याचे दिसून येत आहे. या गुंडांना वेळीच न रोखल्यास त्यातून महाविद्यालयाच्या परिसरात सराईत गुन्हेगार तयार होण्याचा धोका आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर लॉकडाऊनला शिथिलता देण्यात आली. त्यानंतर आता महाविद्यालय परिसरात युवकांची वर्दळ वाढली आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात बाहेरील आणि संबंध नसलेले अनेक तरुण दिसून येतात. त्यातून काहींचे वर्चस्व ठेवण्यासाठी विविध पद्धतीने दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत.
येथील कॉलेज कॉर्नर परिसरातील महाविद्यालयाच्या आवारात दोन महिन्यापूर्वी एकावर चाकूने हल्ला झाला. त्यातून तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चौघांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. काही दिवसानंतर हल्ला झालेल्या तरुणाने साथिदारांना बरोबर घेऊन विश्रामबाग चौकातील एका महाविद्यालयाच्या परिसरात या हल्लेखोरांना मारहाण केली. हा प्रकारही पोलिस ठाण्यात दाखल झाला.
विश्रामबाग चौकाजवळील महाविद्यालयातील एका युवकाचा मोबाईल काढून घेऊन त्याला बेदम मारहाण केली. "तू आम्हाला महिन्याला पैसे दिले नाहीस तर, तुझी काही खैर नाही, तुला आम्ही सोडणार नाही", असे धमकावले होते. त्यावर त्या युवकाने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती.
आता चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात एका 17 वर्षाच्या युवकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्याच्यावर काठी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या गुन्हेगारांना वेळीच रोखण्याची गरज आहे. अन्यथा त्यातून सराईत गुन्हेगार तयार होण्याचा धोका आहे. येथील वालचंद महाविद्यालयात प्रवेशद्वारातच चौकशी करून, नोंद घेऊन आत सोडले जाते. महाविद्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. इतर महाविद्यालयातही सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा करून बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.