शाळांची घंटा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात १५ डिसेंबरपासून

शाळांची घंटा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात १५ डिसेंबरपासून
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा 1 डिसेंबरपासून (बुधवार) सुरू होणार असल्या, तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, मराठवाडा येथील महापालिका व खासगी शाळांची घंटा 15 डिसेंबर किंवा त्यानंतर वाजणार आहे. पालघरमध्ये मात्र उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्‍त व पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मंगळवारी पार पडलेल्या संयुक्‍त बैठकीत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई व ठाणे महापालिकेनेही असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथील शाळाही 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

कोरोना आटोक्यात असल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईत आजही दररोज 200 पर्यंत कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतील 'ओमायक्रॉन' व्हेरियंटचे सावट असल्यामुळे पालकांनी काही दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवावेत, असे मत व्यक्‍त केले होते. त्यामुळे शिक्षणाधिकार्‍यांनी आयुक्‍तांकडे शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.

शाळांची घंटा : पुण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतर

पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तूर्तास बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून 15 डिसेंबरनंतर घेण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांची याबाबत बैठक झाली.

उत्तर महाराष्ट्र : नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा उघडण्यासंदर्भात घाई केली जाणार नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास व शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या संमतीपत्रानंतरच शाळा उघडण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. शहरातील शाळाही 10 डिसेंबरनंतरच उघडल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव ग्रामीण आणि महापालिका क्षेत्रातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

मराठवाडा : नांदेड जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबरऐवजी 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे. परभणीत शहरी भागातील 5 वी ते 7 वी वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, पहिली ते चौथीबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. औरंगाबाद महापालिका हद्दीत शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 तारखेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागात मात्र पहिली ते चौथीच्या वर्गांची घंटा घणघणणार आहे.

विदर्भ : नागपूर शहरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात 10 डिसेंबरनंतरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्‍त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले. तथापि, ग्रामीण भागातील शाळा मात्र उद्यापासून सुरू होणार आहेत. बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, अकोला, आणि भंडारा येथील शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शाळाही उद्यापासून सुरू होणार आहेत.

शाळा आता नवीन वर्षातच

राज्यातील महानगरांसह अनेक ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेऊन 10 ते 15 डिसेंबरनंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंगळवारी जिल्हा आणि महापालिका प्रशासनांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार 15 डिसेंबरनंतर शाळांची घंटा वाजली तरी पाठोपाठ नाताळची सुट्टी असणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने शाळा नवीन वर्षातच उघडणार आहेत.

नवी मुंबईत दिवसाआड शाळा

नवी मुंबई महापालिकेनेही 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत बोलावले जाणार आहे. शाळा दोन सत्रांत चालविल्या जाणार आहेत. एका वर्गात केवळ 25 विद्यार्थ्यांनाच बसता येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news