सांगली महापालिकेतील घोटाळ्यांप्रकरणी 25 जानेवारीला सुनावणी | पुढारी

सांगली महापालिकेतील घोटाळ्यांप्रकरणी 25 जानेवारीला सुनावणी

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेतील विविध घोटाळ्यांप्रकरणी दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 12.45 वाजता ‘गुगल मीट’वर ऑनलाईन सुनावणी होणार आहे. राज्याच्या लोकायुक्तांसमोर ही सुनावणी होणार आहे. सुनावणीस ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी तक्रारदारांसह महापालिकेच्या आयुक्तांनाही लोकायुक्त कार्यालयातून नोटीस आली आहे.

नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वेे, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर यांनी महापालिकेतील विविध घोटाळ्यांसदर्भात राज्यपाल, ईडी, लोकायुक्त, नगरविकासचे प्रधान सचिव तसेच आमदार यांंना निवेदन दिले होते.

महापालिकेतील विविध घोटाळ्यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. दोषींकडून रक्कम वसूल करावी. त्याबाबत आवश्यक कागदपत्रे व म्हणणे देण्यास तयार असल्याचेही म्हटले होते.

आमदार सुधीर गाडगीळ यांनीही बर्वे यांच्या पत्राचा संदर्भ देऊन चौकशीची मागणी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. त्यावरून नगरविकास विभागाने तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेकडून मुद्देनिहाय अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह मागविला आहे. महापालिकेकडून हा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, लोकायुक्तांनी या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 12.45 वाजता ऑनलाईन सुनावणी ठेवली आहे. ‘गुगल मीट’वर ही सुनावणी होणार आहे. बर्वे म्हणाले, महापालिकेच्या सन 1998 ते 2010 अखेरच्या लेखापरीक्षणातून भारअधिभाराखाली वसूल पात्र रकमा 1 हजार कोटी रुपयांच्या आहेत.

सन 2010 ते आजअखेरही अनेक घोटाळे झाले आहेत. हे सर्व घोटाळे उघडकीस आणून दोषी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकार्‍यांवर कारवाई करावी. त्यासंदर्भातील पत्र राज्यपाल, ईडी, लोकायुक्त, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेले आहे. त्याची दखल घेतली जात आहे.

 

Back to top button