मूल्यवर्धित कापड उत्पादनासाठी पॅावरलुम डेव्हलपमेंट कार्पोरेशन सहकार्य : गजाननराव होगाडे | पुढारी

मूल्यवर्धित कापड उत्पादनासाठी पॅावरलुम डेव्हलपमेंट कार्पोरेशन सहकार्य : गजाननराव होगाडे

विटा; पुढारी वृत्तसेवा: केवळ ग्रे कापड विकण्याऐवजी मुल्यावर्धित कापड उत्पादन करुन फायदेशीर व्यवसायासाठी तरुण यंत्रमागधारकांनी पुढे यावे. यासाठी पॅावरलुम डेव्हलपमेंट कार्पोरेशन सहकार्य करेल अशी ग्वाही पॅावरलुम डेव्हलपमेंट एक्स पोर्ट्सचे गजाननराव होगाडे यांनी दिली.

विट्यात महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळ, मुंबई आणि विटा यंत्रमाग संघाच्या संयुक्त विद्यमाने वस्त्रोद्योग परिषदेत पॅावरलुम डेव्हलपमेंट एक्स पोर्ट्सचे गजाननराव होगाडे बोलत होते. मुंबईतील महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रातील कोष्टी समाजाची शिखर संस्था आहे. या परिषदेत पारंपारिक विणकाम करणाऱ्या विणकरांच्या समस्यांबाबत विचार विनिमय आणि उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ ऑफ लाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.इचलकरंजी, फलटण, विटा, वडवणी, पेठवडगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणचे कोष्टी समाज पदाधिकारी या परिषदेस ऑफलाईनद्वारे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी कोष्टी सेवा मंडळांचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते होते. या परिषदेत वीज दरप्रश्नी वीज तज्ज्ञ‍ प्रतापराव होगाडे, निर्यात संधीबाबत पॅावरलुम डेव्हलपमेंट एक्सपोर्ट्सचे गजाननराव होगाडे, बॅंक क्षेत्रातील समस्यांबाबत इचलकरंजी जनता बॅंकेचे संचालक महेश सातपुते तसेच विकेंद्रीत यंत्रमागासमोरच्या समस्या आणि उपाय योजनांबाबत इचलकरंजी पॅावरलूम असशिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी आणि विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी आपले मनोगत केले.

विटा देवांग समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय चोथे यांनी स्वागत केले. विणकाम व्यवसाय असलेल्या कोष्टी समाजाच्या पारंपारीक विणकाम क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा करून एक सर्वकष निवेदन राज्य आणि केंद्रातील शासन प्रतिनिधींना देण्याचा तसेच या व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रकाशराव सातपुते यांनी सांगितले.

प्रतापराव होगाडे यांनी महाराष्ट्रातील विद्यमान वीज दर आणि सवलतींबाबत सविस्तर माहिती देऊन शेजारच्या कर्नाटक, गोवासारखी इतर राज्ये रोजगारनिर्मीतीसाठी वस्त्रोद्योगास सवलत देत आहेत. मात्र, राज्य सरकार तितक्या प्रमाणात देऊ शकत नाही अशी खंत व्यक्त केली. गजाननराव होगाडे यांनी सध्या यंत्रमागावरदेखील निर्यातक्षम कापड उत्पादन घेता येते आणि वस्त्रोद्योगाच्या एकूण निर्यातीमध्ये सध्या यंत्रमागाच्या कापडनिर्यातीचा वाटा मोठा असून केवळ ग्रे कापड विक्री करण्याऐवजी मुल्यावर्धित कापड उत्पादन करुन फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी तरुण यंत्रमागधारकांनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी पॅावरलुम डेव्हलपमेंट कार्पोरेशन सहकार्यासाठी तयार असेल असे सांगितले.

सतिश कोष्टी यांनी विकेंद्रित यंत्रमाग व्यवसायाचे अनेक प्रश्न राज्य केंद्र शासनदरबारी प्रलंबित आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळत नाही. यासाठी आणखी संघटीत प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. किरण तारळेकर यांनी विकेंद्रीत यंत्रमाग व्यवसाय गेल्या पाच- सहा वर्षापासून कमालीचा अडचणीतून जातोय. याचे मूळ, केंद्राच्या कापूस आणि आयात निर्यात धोरणात आहे. कापसाचा समावेश कमोडीटी मार्केटमध्ये झाल्यापासून दररोजच्या तेजीमंदीमुळे कापूस आणि पर्यायाने सूत आणि कापड दरात अस्थिरता येत आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे दीर्घकालीन धोरण घेता येत नाही. कापूस व्यापारातील शून्य व्याजदराचे प्रचंड भांडवल असलेल्या बहुराष्ट्रीय भांडवलदार कंपन्यांचा हस्तक्षेप, साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई करण्यामुळे व्यवसाय अस्थिर झाल्‍याचे सांगितले. यावेळी अंकुशराव उकार्डे, उत्तमराव म्हेतर, नितीन गजानन दिवटे, कोल्हापुरचे राजेंद्र ढवळे, सुरेश म्हेत्रे यांचीही भाषणे झाली.

नियाेजन मिलिंद कांबळे व शितल सातपुते नियोजन केले. सेवामंडळाचे महासचिव रामचंद्र निमणकर यांनी सूत्रसंचालन केले. या परिषदेस पुणे येथून पुणे कोष्टी समाजअध्यक्ष सुरेश तावरे, सुनिल ढगे, अशोक भुते, भगवानराव गोडसे, दत्तात्रय ढगे, इचलकरंजीचे कोष्टी समाज अध्यक्ष विश्वनाथराव मुसळे, मनोज खेतमर, अरुण वडेकर, सौ. सुधाताई ढवळे, सौ. प्राक्तताई होगाडे, वैभव म्हेत्रे, शिवाजीराव कलढोणे, विनोद तावरे, नितीन तारळेकर, उत्तमराव चोथे, सचिन रसाळ, राजु भागवत यांसह अनेक यंत्रमागव्यावसायिक उपस्थित होते. परिषदेमध्ये केंद्र व राज्य शासनास सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button