पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी होणार भिकारीमुक्त

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी  होणार भिकारीमुक्त
Published on
Updated on

पिंपरी : मिलिंद कांबळे :

राहण्याजोगे शहर म्हणून वाढती पसंती दिली जात असलेल्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी 'भिकारीमुक्त' केली जाणार आहे. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी पोलिसांचे सहाय्य घेतले जाणार आहे.

इंदूर पॅटर्ननुसार शहर स्वच्छ, सुंदरतेचा ध्यास

महापालिकेतर्फे शहरात इंदूर पॅटर्न राबविला जात आहे. त्याअंतर्गत शहर कचराकुंडीमुक्त करण्यास सुरूवात झाली आहे. एकूण 425 कुंड्यांपैकी 250 पेक्षा अधिक कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. घरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा सक्तीने घेतला जात आहे. तसेच, होर्डिगमुक्त शहर करण्यासाठी धडक कारवाई मोहीम होती घेतली असून, 235 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग तसेच, 40 हजार फ्लेक्स व किऑक्स जप्त केले आहेत.

शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात भिकार्‍यांचा अडसर आहे. चौक, बस व रेल्वे स्थानक, बाजारपेठा, प्रार्थनास्थळे अशा वर्दळीचे ठिकाणे भिकारी, बेघर व्यक्तींनी व्यापली आहेत. उघड्यावर शौच व आंघोळ तसेच, स्वयंपाक करून ती मंडळी परिसरात अस्वच्छता करतात. तसेच, शहर सौंदर्यास बाधा पोहचून विद्रुपीकरण होत आहे. विशेषत: चौकात भिकार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. भिकारी खरोखरच शहरातील आहेत की बाहेरून येतात, यांचा शोध घेणे गरजेचे आहे.

अशा भिकार्‍यांना अटक करून न्यायालयाच्या संमतीने त्यांची पुनर्वसन केंद्रात रवानगी केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयास भिकारी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यासाठी पालिका सहाय करणार आहे. रस्त्यावर कोठेही राहून अस्वच्छता करणार्‍या बेघर व्यक्तींचे सक्तीने निवारा केंद्रात सोय केली जाणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तृतीयपंथीयांकडून नागरिकांना व दुकानदारांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका व पोलिसांचे विशेष स्वतंत्र पथक निर्माण केले जाणार आहे.

भिकारी, बेघर, तृतीय पंथियांचा शोध घेऊन त्याचे पुनवर्सन केले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगारही दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न सुटणार आहे. परिणामी, भिकारी, बेघर व तृतीयपंथीयांचे भीक मागत फिरणे बंद होऊन, शहर स्वच्छ व सुंदर होण्यास गती
मिळणार आहे.

शहरात 154 बेघर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत मार्च व एप्रिल 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण 154 बेघर व्यक्ती आढळून आले होते. त्यात 97 पुरूष व 57 महिला होत्या. त्यात बालकांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. मार्च 2017 मधील सर्वेक्षणात ही संख्या 105 होती. कोरोना संक्रमण व लॉकडाऊनमुळे बेघर व भिकार्‍यांची संख्या घटली होती. लॉकडाऊन शिथिल होऊन उद्योगधंदे व व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने बेघर व भिकार्‍यांची संख्या वाढली आहे. शहरात सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक भिकारी व बेघर असल्याचा अंदाज आहे.

शहर सुंदरतेसाठी ही पावले उचलणार

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. कचराकुंड्या हटविल्या जात आहेत. घर, हाउसिंग सोसायटी, दुकानदार, व्यावसायिक, कार्यालय असे सर्वांना ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करून तो वेगवेगळ्या दोन डस्टबिनमध्ये ठेवणे सक्तीचे केले आहे. सर्व झाडांच्या खोडांना रंग देण्यात येत आहेत. अनधिकृत जाहिरात होर्डिग, फ्लेक्स व किऑक्स हटवून एकसमान आकाराचे होर्डिग पालिका उभारणार आहे. शहरातील भिकारी, बेघर व तृतीयपंथीयांचे पुनवर्सन केले जाणार आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांना आळा घातला जाणार आहे.

अपघाती ठिकाणे सुरक्षित करणार

शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅक एकसमान रचनेनुसार तयार केले जाणार आहेत. चौकात नव्या डिजाईनची सिग्नल यंत्रणा उभारली जाणार आहे. अपघात होत असलेल्या शहरातील सुमारे 15 अपघातांच्या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीसाठी शास्त्रीय पद्धतीने सुशोभीकरण केले जाणार आहे. बीआरटीएसचे मार्ग व बस थांबे दुरूस्ती करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याची देखभाल व सुरक्षेसाठी पीएमपीएल प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील बेवारस वाहने जप्त करण्यात येत आहेत. नियमभंग करणार्‍या वाहनांना दंड करण्यात येणार आहे.

पालिका व पोलिसांचे कृती दल

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी भिकारी दृष्टीस पडतात. त्यामुळे शहर सौंदर्यास बाधा पोहचत आहे. तसेच, अस्वच्छता पसरत आहे. शहरातील सर्व भिकारी, बेघर व नागरिकांना त्रास देणार्‍या तृतीयपंथीयांचा शोध घेऊन न्यायालयाच्या सहमतीने त्यांचे पुनवर्सन केले जाणार आहे. त्यासाठी पालिका व पोलिस यंत्रणा संयुक्तपणे कृती पथक तैनात करीत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. अस्वच्छता करणार्‍यांवर दंडात्मक तसेच, फौजदारी कारवाई ही केली जाणार आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news