मिरजेत ॲसिड गोदामात स्फोट; पोलीस अधिकारी ,चार कर्मचारी जखमी | पुढारी

मिरजेत ॲसिड गोदामात स्फोट; पोलीस अधिकारी ,चार कर्मचारी जखमी

मिरज , पुढारी वृत्तसेवा

मिरज औद्योगिक वसाहत रस्त्यांवर गणेश कॉलनी येथे मिलिंद केमिकल या सॅनिटरी केमिकल गोदामास अगरबत्ती पेटविताना आग लागल्याने ॲसिड साठ्याचा स्फोट झाला. यावेळी ॲसिड कॅन व बॅरल हटविण्यासाठी गेलेले गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह सहाय्यक फौजदार सुभाष पाटील, चंद्रकांत गायकवाड, अभिजित पाटील प्रवीण हुक्कीरे, हे चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णलयात उपचार करण्यात आले.

मिरजेत गणेश नगर येथे मिलिंद बाबर यांचा सॅनिटरी अॅसिड तयार करण्याचा कारखाना दोन खोल्यात आहे. शुक्रवारी सकाळी ॲसिड साठ्याला अचानक आग लागून. येथील ॲसिडच्या चार बॅरलचा स्फोट झाला. यामुळे मोठी आग लागल्याने बाजूच्या खोलीत असलेले लहान बाळ व वृद्धेस वाचविण्यासाठी पोलिसांनी तेथे धाव घेतली.अॅसिड साठा बाहेर काढताना स्फोट झाल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. आगीत गोदाम मालक मिलिंद बाबर हे किरकोळ जखमी झाले. अॅसिड साठा ठेवलेल्या खोलीत पूजा करताना अगरबत्तीमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. अग्निशामक विभागाच्या चार बंब व कर्मचार्‍यांनी आग विझवली. आगीत सुमारे चार लाखांचे नुकसान झाले.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारखाना चालक मिलिंद बाबर देवपूजा करताना अॅसिड साठ्याने पेट घेतल्याने पूर्ण कारखाना जळून खाक झाला. ॲसिडचा उग्र वास परिसरात पसरला होता. पोलीस कर्मचारी अभिजित पाटील यांनी खोलीत असलेले दोन गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी हानी झाली नाही.

हेही वाचा : 

Back to top button