जिल्हा बँक निवडणूक : निकाल सांगली, सातार्‍याचा; धास्ती कोल्हापुरात | पुढारी

जिल्हा बँक निवडणूक : निकाल सांगली, सातार्‍याचा; धास्ती कोल्हापुरात

कोल्हापूर : संतोष पाटील

सातारा आणि सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( जिल्हा बँक निवडणूक ) दिग्गजांना पराभाव स्वीकारावा लागला. प्रमुख नेते आपली निवडणूक बिनविरोध करून राजकीय उठ्ठे काढण्याचा करेक्ट कार्यक्रम करत असल्याचे दोन जिल्ह्यांतील निकालातून स्पष्ट झाले. भाजपचा अनपेक्षित शिरकाव, एकतर्फी वाटणार्‍या लढतीत अंतिम क्षणी होणारी काँटे की टक्कर यातून सातार्‍यात राष्ट्रवादीला तर सांगलीत काँग्रेसला धक्का बसला. यामुळेच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेते आणि राजकीय पक्ष सावधपणे हालचालींवर भर देणार आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्याने 10 जागांसाठी चुरशीने मतदान झाले( जिल्हा बँक निवडणूक ) . सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले तर काँग्रेसच्या उंडाळकर गटाने 53 वर्षांत प्रथमच प्रतिनिधीत्व गमावले. आ. शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनेल करत राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेतले. नव्या समीकरणात शिवसेना व काँग्रेस या मित्रपक्षांना बाजूला ठेवणार्‍या राष्ट्रवादीचे बँकेतील संख्याबळ बारापर्यंत घसरले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ( जिल्हा बँक निवडणूक ) विकास महाआघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजप आघाडीने चार जागा जिंकून आपले अस्तित्व निर्माण केले. काँग्रेसचे राजकीय नुकसान झाले तर शिवसेनेला दोन जागांचा बोनस मिळाला. राष्ट्रवादीची संख्यात्मक ताकद कमी झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षाने आघाडी धर्म पाळला नाही. यामुळेच आपला पराभव झाल्याची खंत सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांनी उघडपणे बोलून दाखवली.

सांगली आणि सातारा जिल्हा बँकांच्या राजकारणाची पुनरावृत्ती कोल्हापुरात होऊ शकते. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात भाजपची ताकद वाढलेली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या होमपिचवर सामना रंगणार असल्याने राज्याचे लक्ष आहे. भाजपला अस्तित्व दाखवण्याची मोठी संधी जिल्हा बँकेच्या निमित्ताने आहे. राष्ट्रवादीला बँकेच्या चाव्या आपल्याच ताब्यात ठेवण्याचे आव्हान आहे. शिवसेनेची सर्वच तालुक्यांत ताकद जिल्हा बँकेत दाखवावी लागेल. काँग्रेसला तडजोडीच्या राजकारणात सन्मानजनक संख्याबळ राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच घटकांना दगाफटका होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी ठरू शकते.

नव्या समीकरणांची नांदी ( जिल्हा बँक निवडणूक )

सत्ताधार्‍यांतील नारांजावर विरोधकांची मदार असेल. बिनविरोधच्या चर्चेत विरोधी भाजप आघाडीकडून किमान सहा जागांची मागणी होऊ शकते. आताच सत्ताधारी आघाडीत एक-दोन जागांशिवाय स्पेस नाही. मागील वेळी आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ए. वाय. पाटील बिनविरोध संचालक झाले. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे आदीं नेते बिनविरोधासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील. इच्छुकांसह अनेक संचालकांना पॅनेलमध्ये प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे.

Back to top button