सांगलीतील चौदा एस.टी. कर्मचार्‍यांची सेवा समाप्त | पुढारी

सांगलीतील चौदा एस.टी. कर्मचार्‍यांची सेवा समाप्त

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या 18 दिवसांपासून सुरू असणारा एस.टी. संप बुधवारीही सुरूच होता. मात्र दुसर्‍या बाजूला संप मोडीत काढण्याच्या दृष्टीने एस.टी. प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 50 हून अधिक रोजंदारी कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने बुधवारी जिल्ह्यात 98 एस.टी गाड्या धावल्या. तसेच 14 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महामंडळाने नवीन चालकांना नियुक्ती देवून एस.टी. ची वाहतूक सुरू केली आहे.जिल्ह्यातील सर्व आगारातून महामंडळाच्या आणि खासगी शिवशाही, अशा बुधवारी 98 बस सोडण्यात आल्या.

सांगली आगारातून बुधवारी 19 एस.टी. धावल्या. तसेच मिरज आगारातून 23, इस्लामपूर 19, तासगाव 5, कवठेमहांकाळ 3, आटपाडी 4, जत 13, पलूस 4, शिराळा 1 आणि विटा 6 अशा 98 गाड्या धावल्या. मिरजेतून स्वारगेटला पाच शिवशाही गाड्या सोडण्यात आल्या. कामावर न येणार्‍या कर्मचार्‍यांवर गेल्या तीन-चार दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे.

आतापर्यंत 284 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. बुधवारी एकाही कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले नाही. मात्र 14 कर्मचार्‍यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 50 जणांची सेवासमाप्त केली आहे. इतर काही कर्मचार्‍यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेले कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांचीही सेवासमाप्त करण्याचा इशारा प्रशासनाच्यावतीने दिला आहे.

Back to top button