फ्रान्स (France) येथून इंग्लंडकडे चाललेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. यात २७ निर्वासितांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. कलाईस चॅनलजवळ ही दुर्घटना घडली असल्याची माहिती फ्रान्सच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी वेगाने मदतकार्य सुरु आहे.
फ्रान्सचे मंत्री जेराल्ड डरमानीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट उलटून जी दुर्घटना घडली आहे त्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पाच महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेतून दोन लोकांना वाचविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. बोटीवरील निर्वासीत नेमके कुठले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची माहिती घेतली जात आहे. ही मोठी दुर्घटना असून ती दुःखदायक आहे.
फ्रान्सच्या उत्तर किनाऱ्यावरील एक निर्वासितांची छावणी हल्लीच नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच ही दुर्घटना घटना घडली आहे. उत्तर किनाऱ्यावरून इंग्लंमध्ये निर्वासितांचे जाणे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून यात वाढ झाली आहे. या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. नंतर २७ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.