सांगली जिल्‍हा बँक निवडणूक : सस्पेन्स.. थ्रीलर..जल्लोष अन् सन्नाटा | पुढारी

सांगली जिल्‍हा बँक निवडणूक : सस्पेन्स.. थ्रीलर..जल्लोष अन् सन्नाटा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुढील पाच वर्षे ताबा घेण्यासाठी मोठ्या चुरशीने निवडणूक झाली. निकालाबाबत उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती. मंगळवारी मतमोजणीला सुरुवात सुरू झाली.  निकाल स्पष्ट होताच जल्लोष… गुलालाची उधळण… ‘अरे ही ताकद कुणाची’…‘हा आवाज कुणाचा’.. ‘कोण म्हणतंय येत नाय’.., अशा घोषणांनी विजयाचा आवाज बुलंद करीत तरुणाईने आनंदोत्सव साजरा केला.

फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा व डॉल्बीचा दणदणाट… जयघोष आणि कोठे निराशेची सामसूम…! अशा भावनांमध्ये मतदान केंद्राचे वातावरण गुलाबी झाले होते.

मिरज येथील शेतकरी भवनमध्ये सकाळी सातपासून उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, मतमोजणीच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली. नऊच्या सुमारास मतमोजणीला प्रारंभ झाला. निकाल जाहीर होऊ लागताच उमेदवारांसह कार्यकर्त्यांत धाकधूक वाढू लागली. एक-एक निकाल बाहेर येऊ लागला. यानंतर गुलालाच्या उधळणीत फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या. विजयी उमेदवारांच्या जयजयकाराने आसमंत भरून जाऊ लागला.

गुलालाचे ढीग जमिनीवर टाकून ओंजळीने गुलाल उधळल्याने रस्ते आणि कार्यकर्ते गुलालात न्हावून निघाले होते. जिल्ह्यातील सात सोसायटी गटातील मतमोजणी दुपारी 12 वाजेपर्यंत झाली. त्यानंतर मजूर, पतसंस्था गटांच्या मतमोजणीस सुरूवात झाली. नंतर महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती, प्रक्रिया संस्था आणि इतर सहकारी संस्था अशी मतमोजणी झाली.

निकाल ध्वनिक्षेपकावरून जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. पराभूत झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत शांतता पसरत होती. गटनिहाय निकाल बाहेर पडले आणि एका पाठोपाठ एक जल्लोषांचे बार उडू लागले. गुलालाची उधळण सुरू झाली.

मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांना रोखताना पोलिसांना कसरत करावी लागत होती. कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, याची चर्चा सुरू होती. निकाल कळेल तसे गावात कार्यकर्त्यांना मोबाईलवरून निकाल कळविले जात होते.
सांगलीत महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांच्या समर्थकांनी विजयाची रॅली काढली. मतदान केंद्रांपासून रॅलीस सुरुवात झाली.

त्यानंतर विष्णूअण्णा भवनमध्ये दोघांचाही सत्कार करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रवादी कार्यालय, काँग्रेस भवन समोर विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले

मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त…

मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणापासून पोलिसांनी कार्यकर्त्यांना दूरवर रोखले होते. मतदान केंद्रावर जाणार्‍या प्रत्येकांची ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जात होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतमोजणी शांततेत पार पडली.

हेही वाचलं का?

Back to top button