कोल्हापूर : ऊसतोडणी कामगाराचा खून; एकास अटक | पुढारी

कोल्हापूर : ऊसतोडणी कामगाराचा खून; एकास अटक

मुरगूड ; पुढारी वृत्तसेवा : अकोल्याहून ऊसतोडणीसाठी आलेल्या तोडणी मजुरांमध्ये आपापसात झालेल्या भांडणातून संजय फुलचंद जामुणकर (वय 28) या ऊसतोडणी कामगाराचा खून करण्यात आला. ही घटना कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे मंगळवारी पहाटे घडली.

मुरगूड पोलिसांत घटनेची नोंद झाली असून, सुनील नंदुलाल मावसकर (30) यास अटक करण्यात आली आहे. मृत व संशयित एकाच गावचे रहिवासी असून, चांगले मित्र होते. वारी हनुमान भैरोगड (ता. तिल्हारा, जि. अकोला) येथील ऊसतोडणी मजुरांची टोळी बिद्री साखर कारखान्याचे ऊसपुरवठा वाहतूक कॉन्ट्रॅक्टर विनायक मोरबाळे (रा. अवचितवाडी) यांच्या ट्रॅक्टरवर काम करण्यास आली आहे. हे मजूर अवचितवाडी येथील कटी नावच्या शेतात पाल मारून राहत होते.

मंगळवारी पहाटे सुनील मावसकर याने संजय जामुणकर हा आपला भाऊ अनिल मावसकर याच्याबरोबर भांडत असल्याचा राग मनात धरून, ‘तू मेरे भाई के साथ क्यों लढ रहा है,’ असा प्रश्न करत संजयच्या डोक्यात लाकडी ओंडक्याने घाव घातला. वर्मी घाव बसल्याने संजयचा जागीच मृत्यू झाला. ऊसतोडणी कामगाराचा खून झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित सुनील मावसकरला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळी संजयचा मृतदेह मुरगूड ग्रामीण रुग्णालयात आणून त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. येथून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी संजयच्या गावाकडे नेण्यात आला. या घटनेने ऊसतोडणी मजुरांमध्ये खळबळ उडाली आहे. पोट भरण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच परिसरात आलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या आपसातील भांडणाने एकास नाहक जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button