उद्या एसटी संप मिटणार? एसटी कामगारांना सरकारने दिला ‘हा’ पर्याय | पुढारी

उद्या एसटी संप मिटणार? एसटी कामगारांना सरकारने दिला ‘हा’ पर्याय

मंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांचे प्रतिनिधी तसेच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी आज संपावरील तोडग्याबाबत चर्चा केली. या चर्चेअंती सरकारने न्यायालायीन समितीचा अहवाल येई पर्यंत तसेच एसटी कामगारांचे चालले आंदोलन संपावे यासाठी काही पर्याय दिले आहेत. या पर्यायामध्ये अंतरिम वाढ कामगारांना देण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटीचे राज्यशासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी व कामगार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलानाचे नेतृत्त्व भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपिचंद पडळकर करत आहेत. हे आंदोलन त्वरित संपावे यासाठी आज राज्यसरकारने एक पाऊल पुढे टाकत एसटी कामगारांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी दर्शवली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांचे प्रतिनिधी आणि आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्या सोबत संपाबाबत चर्चा केली. अनिल परब यांनी ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, एसटीचे राज्यशासनात विलिनीकरण व्हावे हा विषय उच्च न्यायालयात गेलेला आहे. न्यायालयाने यावर एक समिती गठीत केली असून त्या समितीचा अहवाल येई पर्यंत या विषयाबाबत सरकार तसेच एसटी कामगार आंदोलक काहीही करु शकत नाही. कारण हा विषय आता न्यायालयाच्या अख्त्यारित आहे.

समितीने हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करायचा आहे. त्यानंतर तो अहवाल मुख्यमंत्री न्यायालयाकडे सादर करतील. या सर्व प्रक्रियेसाठी खूप वेळ जाणार आहे. तो पर्यंत एसटी कामगारांनी आंदोलन थांबवावे व त्यांना काहीतरी दिलासा मिळावा म्हणून आज एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली. या चर्चे दरम्यान सरकारने पर्याय दिले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

एसटी कामगारांनी हे आंदोलन थांबवावे. तो पर्यंत त्यांना अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेव्हा समितीचा अहवाल तेव्हा ज्या सुचना असतील त्या लागू करण्यात येतील. जर समितीने एसटीचे विलिनीकरण सांगितले तर ते केले जाईल. पण अहवाल येई पर्यंत हे आंदोलन थांबवले जावे यासाठी त्यांना अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव दिला आहे. उद्या पुन्हा सकाळी ११ वाजता चर्चा करण्याचे ठरले आहे. यामध्ये त्यांनी या प्रस्तावाचा विचार करुन सांगू असे सांगितले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत सकारत्मक निर्णय होईल असे वाटते, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

Back to top button