भित्रा, बुजरा गवा..ऊसपट्ट्यात आलाच कसा? | पुढारी

भित्रा, बुजरा गवा..ऊसपट्ट्यात आलाच कसा?

सांगली ; विवेक दाभोळे

कृष्णा – वारणा काठच्या गावांत गव्याचे दर्शन होणे आता लोकांच्या अंगवळी पडू लागले आहे. सहा- सात महिन्यांपूर्वी तर तासगाव तालुक्याच्या पूर्वभागातील द्राक्षबागांत गव्याच्या जोडीने धुमाकूळ घातला होता. खरे तर निसर्गत: भित्रा, बुजरा असलेला गवा ऊसपट्ट्यात आलाच कसा, असाच सवाल या निमित्ताने केला जात आहेे. समडोळीपाठोपाठ आता कसबेडिग्रज येथेही सलग चार दिवस गव्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे आता ऊसपट्ट्यात गव्याचा गवगवा होऊ लागला आहे.

खरे तर गवा हा दाजीपूरच्या जंगलातच दिसतो हे आपण सारेच चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकातून शिकलो आहोत. महाकाय आणि तितकाच रूबाबदार दिसणारा गवा जंगलातच शोभून दिसतो. विशेष म्हणजे वन्यप्राण्यांत सर्वाधिक ताकदवान असलेला हा प्राणी तितकाच भित्रा आणि बुजरादेखील आहे.

दाजीपूर, चांदोलीचे जंगल गव्यांसाठी हक्काचे अधिवास! मात्र आता बदलत्या काळात गवादेखील जागा सोडून बाहेर पडला आहे. त्याची माहिती देखील तितकीच उत्कंठापूर्ण ठरते. गवा हा सस्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील एक प्राणी! भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव ‘बॉस गॉरस’ (इेीीशी सर्र्रीीीी)असे आहे. गवा उष्णकटिबंधातील प्राणी आहे. थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम, नेपाळ, भूतान आणि आपल्या देशात गवा आढळतो.

जगभरातील गव्यापैकी 80 टक्के गवे भारतात आढळतात. प्रामुख्याने देशातील डोंगराळ भागातील जंगलात, हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत गवे आढळतात. महाराष्ट्रात रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांमधील डोंगराळ प्रदेशात ते आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये डोंगराळ प्रदेशातील गवत व पाने संपल्यावर ते हिरवळ असलेल्या भागांत जातात.

त्याचप्रमाणे गवा हा आपल्या देशातील खूरवाल्या प्राण्यांपैकी सर्वांत मोठा आणि वजन असलेला प्राणी आहे. त्याची शरीरयष्टी भरदार असते. पूर्ण वाढलेल्या नर गव्याची उंची सुमारे 180 सेंमी. व लांबी जवळपास 300 सेंमी. असते. नर गव्याच्या शिंगांचा विस्तार मुळापासून 78-90 सेंमी असतो. कान आकाराने मोठे असतात. नर गव्याचे वजन 900-1000 किलोग्रॅम असते. मादी ही नरापेक्षा लहान असते. गव्याच्या खांद्यावर एक मांसल उंचवटा (लहान वशिंड) असते. हे वशिंड त्याच्या पाठीच्या मध्यापर्यंत गेलेले असते. गव्याचे नुकतेच जन्मलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते.

हळूहळू तांबूस रंगाचे होऊन शेवटी लालसर तांबड्या रंगाचे अथवा कॉफी रंगाचे होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर गव्याच्या शरीराचा रंग काळा होतो. कपाळ राखाडी रंगाचे असते. गव्याचे पाय बळकट असतात. त्याचा खालचा भाग गुडघ्यापर्यंत पांढरा असल्यामुळे हा भाग साधारणपणे पायमोजे घातल्यासारखा दिसतो. शरीरावर केस नसतात. डोळे तपकिरी रंगाचे असतात. मात्र त्याचे गंधज्ञान तीव्र असते. वासावरून त्यांना एकमेकांचा माग काढता येतो. श्रवणशक्ती व दृष्टी मात्र मंद असते. गव्यांची शिंगे गायी-म्हशींच्या शिंगांसारखीच असतात. शिंगे जन्मभर कायम असतात. गवे वेगवेगळ्या परिस्थितीत फिस्कारणे, भ्याँ करून ओरडणे, रेकणे, हंबरणे व शिळ घालणे असे वेगवेगळे आवाज काढतात.

गवे प्राण्याचे मुख्य खाद्य गवत, आणि पानेही खातात. विशेषत: कारवीची पाने आवडीने खातात. सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरिता बाहेर पडतात. दुपारी उन्हाच्यावेळी एकांतस्थळी सावलीमध्ये ते रवंथ करीत पडून राहतात.

गवे क्षारयुक्त जमीन असलेल्या ठिकाणी अधूनमधून जाऊन ती चाटतात. यामुळे त्यांना सोडियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरसयुक्त व क्षारांचा पुरवठा होऊन त्यांची हाडे व स्नायू बळकट होतात. गव्याला दोन खूर असतात. त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे ते डोंगर आणि डोंगरकडा सहज चढून जातात. गवा बलिष्ठ असला तरी स्वभावाने बुजरा व भित्रा असतो. त्याचा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाला, तर तो चिडून क्रूर बनतो.

गव्याचे सामान्यतः 10-12 जणांचे लहान कळप असतात. त्यांचा प्रजननाचा काळ ठराविक असा दिसून येत नाही. नर-मादी डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास माजावर येतात. गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो. प्रजननाचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत पुढेमागे असतो. गव्याचा आर्युकाल 30 ते 40 वर्षे असतो. गवा आणि हत्ती यांचे सहचर्य पुष्कळदा आढळून येते, हे दोन्ही प्राणी एके ठिकाणी चरताना दिसतात.
अर्थात चित्रात जरी गवा गरीब आणि साधा दिसत असला तरी त्याच्याजवळ न जाणे हेच चांगले असेच म्हणावे लागते. सध्या तरी या गवा रेड्याचा वावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button