सांगली : वाकुर्डे योजना आता गतीने पूर्ण होणार | पुढारी

सांगली : वाकुर्डे योजना आता गतीने पूर्ण होणार

शिराळा; विठ्ठल नलवडे

तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजना आता पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाविकासआघाडी सरकारने योजना पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार आता या योजनेसाठी 908 कोटी 44 लाख रुपयांचा दुसरा सुधारित प्रशासकीय प्रस्ताव मंजूर झाला आहे.

योजना सुरुवातीस जेमतेम 110 कोटी रुपयांची होती. वीस वर्षांपूर्वी या योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. या योजनेमुळे शिराळा 7 हजार 270 हेक्टर, वाळवा 18 हजार 565 हेक्टर आणि कराड तालुक्यातील 2 हजार 200 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 110 गावांतील सिंचनापासून वंचित क्षेत्राला पाणी मिळणार आहे. यातून 28 हजार 35 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

सध्या योजना शिराळा उत्तर भागाला, वाळवा, कराड तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदायिनी ठरली आहे. शिराळा तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी तालुक्याचा उत्तर भाग पाण्याच्या प्रतीक्षेत होता. मात्र, या योजनेतून या उत्तर भागासह कर्‍हाड तालुक्यातील 3802 हेक्टर शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

शेतकर्‍यांना वीज बिलाची रक्कम हेक्टरवर आकारण्यात येते

चांदोली धरणातून वाकुर्डे योजनेसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. यातून कर्‍हाड तालुक्यातील 2772 हेक्टर , शिराळा तालुक्यातील 1030 हेक्टर पीक क्षेत्राला पाणी मिळते आहे. शेतकर्‍यांना वीज बिलाची रक्कम हेक्टरवर आकारण्यात येते.

तालुका दुर्गम आहे. चांदोली धरण, वारणा नदी यामुळे तालुक्याचा दक्षिण आणि पश्चिम भाग ओलिताखाली आला आहे. मात्र, उत्तर आणि पूर्व भागात मात्र नेहमीच पाणी टंचाई असते. त्यामुळेच तत्कालीन राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी 1995 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व वरिष्ठ अधिकार्‍यांना तालुक्यात पाण्याची आवश्यकता कशी आहे हे दाखवले. सन 97 – 98 मध्ये वाकुर्डे योजनेला मंजुरी मिळाली. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांनी तालुक्यातील उत्तर भागाला पाणी मिळावे यासाठी वाकुर्डे योजना झाली पाहिजे असा आग्रह धरला होता.

त्यावेळी 110 कोटींची योजना होती. आता खिरवडे व हातेगाव पंप हाउस, हातेगाव ते वाकुर्डे करमजाई धरण व बोगदा झाला आहे. करमजाई धरणात आणि तेथून पलीकडे येणपे बोगद्यातून कराड तालुक्यात चांदोलीचे पाणी आले. आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख, आमदार मानसिंगराव नाईक, ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक, तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी योजनेचे पाणी करमजाई धरणात आणले होते.

11 पैकी सात कि. मी. चे काम पूर्ण

भाजप सरकारने वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी बंद पाईप लाईनमधून नेण्याचा निर्णय घेतला होता. यातून शिराळा व वाळवा तालुक्यातील 15 हजार 275 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या 11 पैकी सात कि. मी. चे काम पूर्ण झाले आहे. चार लघुसिंचन व बारा पाझर तलाव अशा सोळा तलावांतून दोन्ही तालुक्यांतील 39 गावांना पाणी मिळणार आहे. नदीजोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या माध्यमातून वारणा -कृष्णा असा देशातील पहिला नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे.

चांदोली धरणातील पाणी वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पंपगृहाद्वारे उचलून येणपे बोगद्याद्वारे कराड तालुक्याला येणपे येथे मिळाले आहे. येणपे येथून ते दक्षिण मांड नदीतून वाठारजवळ कृष्णा नदीला मिळून हा ऐतिहासिक नदीजोड प्रकल्प साकारला आहे. सन 2014 पासून मिळालेल्या निधीतून त्यापुढे दुसर्‍या टप्प्यात मानकरवाडीपासून बंदिस्त पाईपमधून हे पाणी रेड, रेठरेधरण, सुरूल ओझर्डे, मरळनाथपूर, पेठ, कापरी, कार्वे, ऐतवडे, शिवपुरी, जाक्राईवाडी, इटकरे, इंग्रूळ, चिखलवाडीपासून चिकुर्डे परिसरात वितरित होणार आहे. या कामाचा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रारंभ केला होता.

हेही वाचलक का?

Back to top button