सांगली : पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

सांगली : पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाऊनी, घडकुज, मणीगळ, करपा या रोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औषधांचा खर्च वाढल्यामुळे उत्पादन खर्चही वाढला आहे.

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आरवडे, मांजर्डे, पेड, बलगवडे, मणेराजुरी, सावळज, वायफळे, विसापूरसह अन्य गावात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. या भागात यावर्षी द्राक्ष उत्पादकांनी नियोजनबद्ध छाटण्या घेतल्या आहेत. काही ठिकाणी पोंगा अवस्था, फुलोरा अवस्था पूर्ण झाली असून मणी तयार झाले आहेत. मात्र, आगाप छाटणी घेतलेल्या बागांमध्ये माल मऊ पडला असून काही दिवसांत बाजारपेठेत जाण्यासाठी तयार आहे.

या भागात सध्या फुलोरावस्थेत असलेल्या द्राक्षबागांत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात मणीगळ, घडकुज होऊ लागली आहे. द्राक्ष बागायतदारांचे 20 तेे 40 टक्के नुकसान होणार आहे. तसेच काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात झाली आहे. काही बागांमध्ये घडकुज झाल्यामुळे घडाला मणी शिल्लक राहिलेले नाहीत.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर डाऊनी व करपा रोग दिसून येत आहे.घडामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे घडकुज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

औषधे मारण्यासाठी सरासरी 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च वाढला

कष्टाने संभाळलेले द्राक्ष पीक वाया जाऊ नये यासाठी औषध फवारणी केली जात आहे. घडामध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दि. 25 नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. वातावरण स्वच्छ नाही झाले तर द्राक्षशेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट व खर्चात वाढ झाल्यामुळे द्राक्षशेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अवकाळीमुळे औषधे मारण्यासाठी सरासरी 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च वाढला आहे. उत्पादन खर्च वाढत आहे. अतिरिक्त खर्चासाठी आवश्यक रक्कम कशी उभी करायची, असा प्रश्न आहे.

आरवडेतील शेतकरी विशाल शिंदे म्हणाले, कोरोना संकटानंतर यावर्षी द्राक्ष हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अवकाळी पाऊस व बदलत्या वातारणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. पावसामुळे माझ्या बागेत मोठ्या प्रमाणात घडकुज झाली आहे. मोठे नुकसान झाले आहे मागील हंगामात अतिवृष्टीमुळे बागेचे मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news