सांगली : जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले | पुढारी

सांगली : जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

“सांगली : पुढारी वृत्तसेव” image=”http://”][/author]

जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सलग दुसर्‍या दिवशी नदीकाठाला तसेच पूर्वभागाला वादळी पावसाने झोडपून काढले. सांगली, बुधगाव, तासगाव भागात रात्रभर ढगांचा गडगडाट होता. दरम्यान, या पावसाने अनेक ठिकाणी शेतात, उभ्या पिकांत पाणी साचले आहे. त्यामुळे नुकतीच गती घेत असलेल्या बागायती टापूतील ऊसतोडी काही भागात ठप्प झाल्या.

जिल्ह्यात नदीकाठासह व तासगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी भागाला रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात प्रामुख्याने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. निंबळक, ढवळी, राजापूरसह भागातील द्राक्षबागांमध्ये या पावसाने फुलोरा गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाण्याचे संकट ओढवले आहे. या धोक्याने बागायतदार चांगलाच हबकला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मात्र रात्री या सार्‍याच भागात दमदार पाऊस झाला. वारणा काठात चिकुर्डेपासून ऐतवडे, बागणी, तांदुळवाडी, दुधगाव या सार्‍याच वारणा काठाच्या भागात शिवाराला पावसाने झोडपून काढले.
खानापूर तालुक्यात देखील वेगाच्या वार्‍यासह पाऊस झाला. तालुक्यात भाळवणीसह चिखलगोठण टापूत पावसाचा जोर जास्त होता. या पावसाने भाजीपाला शेतीला मात्र चांगलाच फटका बसला आहे.

निंबळक भागात द्राक्षबागांना फटका ; ऊसतोड ठप्प
निंबळक : वार्ताहर, तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण भागाला रात्री तुफानी वार्‍यासह वादळी पावसाने झोडपून काढले. रात्रभर जोरदार वारा आणि मोठ्या पावसाने भागातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे. पाऊस – वार्‍यामुळे द्राक्षांचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे.

प्रामुख्याने आळते, लिंब, पानमळेवाडी, शिरगाव, वंजारवाडी, तुरची, ढवळी, राजापूर, मोराळे, आंधळी या भागासह खानापूर तालुक्यातील चिंचणी, पारे, मंगरूळ, कार्वे, वाझर आदी परिसराला या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.
या सार्‍याच भागातील बहुसंख्य द्राक्षबागा या मणीपक्वतेच्या अवस्थेत आहेत.

मात्र आता या पावसाने मणी तडकले आहेत. तर फुलोर्‍यात असलेल्या बागांना घडकुजीचा सामना करावा लागणार आहे. तसेच यामुळे द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचे प्रमाण वाढण्याच्या धास्तीने द्राक्षउत्पादक हवालदिल झाला आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात मणी गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उशिरा छाटणीच्या पोंगा अवस्थेत असलेल्या बागांमध्ये डाऊनी, करपा रोगाचा फैलाव होऊ लागला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. मात्र पावसामुळे बागायती टापूत ऊसतोडणी ठप्प झाली आहे. तोडलेला ऊस वाहतुकीने नेण्याची वेळ तोडणी मजुरांवर आली आहे. आता दोन-तीन दिवस नवीन तोडी देखील पूर्णपणे ठप्प होणार आहेत. आता केवळ रस्त्याकडेचा ऊस तोडण्याकडे तोडणी मजुरांचा कल आहे

Back to top button