कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : मतदारांची निष्ठा अन् नेत्यांची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : मतदारांची निष्ठा अन् नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर; संतोष पाटील : विधान परिषद निवडणुकीच्या ( विधान परिषद निवडणूक ) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते लवकरच राजकीय फायदा-नुकसान, भविष्यातील निवडणुका, राजकीय सोय आणि अडचण पाहून भूमिका जाहीर करण्यास सुरुवात करतील. असे असले, तरी नेते सांगतील तेच करायची मानसिकता मतदारांमध्ये दिसत नाही. त्यामुळेच टोकाच्या राजकीय ईर्ष्येच्या या निवडणुकीत मतदारांची निष्ठा आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

लोकसभा, विधानसभा, गोकुळ, केडीसीसी, जिल्हा परिषद, बाजार समिती प्रशासकीय मंडळ येथे निवड करताना त्या मागे विधान परिषद निवडणुकीचे ( विधान परिषद निवडणूक ) गणित पालकमंत्री सतेज पाटील आणि शिलेदारांनी मांडले होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मागील सहा वर्षांपासून सर्वपक्षीय मतदारांशी वैयक्तिक संपर्क ठेवला आहे. भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवार म्हणून ते नवखे असले, तरी मागील 24 वर्षांपासून या मतदारसंघात महाडिक कुटुंबीय थेट संपर्कात आहेत. यंदा जोडीला भाजपची सर्व ताकद ही एक त्यांची जमेची बाजू असल्याने निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

दोन्ही बाजूंच्या नेते मंडळींच्या जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. उमेदवारांचे थेट मतदारांच्या भेटीचे सोपस्कार पूर्ण झाले आहे. पक्ष आणि आघाड्यांच्या बंधनात असलेल्या मतदारांना गृहित धरूनच उमेदवारांच्या ‘थिंक टँक’ची आकडेमोड सुरू आहे. पैसा आणि पद या दोन पैलूंभोवतीच मतदारांचा कल फिरत असल्याने पक्षाचे नेते आणि आघाडी प्रमुखांच्या पाठिंब्यानंतरही उमेदवारांना ‘प्लॅन बी’ची जोडणी करावी लागणार आहे. त्यामुळेच उमेदवारांना प्रत्यक्ष गाठून काय नको, काय हवे, हे जाणून त्याची पूर्तता करणारी खास टीम पडद्यामागून मैदानात सक्रिय झाली आहे.

राजकीय अनुभवाची कसोटी ( विधान परिषद निवडणूक )

सतेज पाटील आणि महाडिक गटाकडे मागील 20 ते 25 वर्षांहून विविध निवडणुकांचा मोठा अनुभव आहे. पक्षीय प्रतिष्ठा परिघाबाहेर जाऊन मैदान मारण्याची कला दोन्ही गटांना अवगत आहे. दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या शिलेदारांकडे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुभवाची मोठी शिदोरी आहे. दोन्ही गटांच्या राजकीय अनुभवाची कसोटी पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे.

आमचा नेता कसा असावा..? ( विधान परिषद निवडणूक )

निवडून आम्ही आलो, निवडणुकीत आम्ही पैसे खर्च केले, अशी मानसिकता बहुतांश जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांची दिसून येत आहे. पुढील वर्षी जिल्हा परिषद आणि त्यापाठोपाठ अर्धा डझन नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राजकीय आणि आर्थिक अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार असावा, अशी मतदारांची अपेक्षा दिसून येत आहे.

Back to top button