ठाकरे-पवारांनीच अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले; किरीट सोमय्यांचा आरोप | पुढारी

ठाकरे-पवारांनीच अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले; किरीट सोमय्यांचा आरोप

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राला लुटण्याचे कारस्थान ठाकरे- पवार सरकारकडून करण्यात येत आहे, सरकारचा गृहमंत्री वसूली प्रकरणामुळे जेलमध्ये जातो यामुळे नेत्यांची मान शरमेने खाली जाण्याऐवजी या उलट ते धमकी देत आहेत. ही धमकी ईडीला, सर्वोच्च न्यायालयाला की भाजपला देता? असा सवाल करत अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच जेलमध्ये टाकले असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार घोटाळे तसेच घोटाळेबाजांवर काहीही बोलत नाही, मी केलेल्या आरोपांचा एकही कागद खोटा आहे हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. देशमुख यांचे जेवढे क्षण जेलमध्ये जात आहेत त्याची किंमत मोजावी लागणार असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ही धमकी कुणाला देता ? असा सवाल त्यांनी केला.

ठाकरे सरकारचे २३ लोक ज्यात राज्याचे मंत्री, अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशा लोकांवर चौकशी सुरु आहे. यामध्ये अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळी आदींची नावे यावेळी सोमय्या यांनी घेतली. पत्रकार परिषदेत अर्जून खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याचे पुरावे, तक्रार आयकर विभाग, सहकार खाते, सहकार मंत्रालयाकडे दिली असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

घोटाळा कुणाचाही असो तो घोटाळाच असतो असे म्हणत ठाकरे सरकारच्या कालावधीत ज्या लोकांनी सरकारी, राजकीय पदाचा दुरुपयोग करुन गोरगरीब जनता तसेच शेतकऱ्यांना लुटले अशा लोकांवर कारवाई व्हायलाच हवी असेही सोमय्या यावेळी म्हणाले.

हे ही वाचलं का?

Back to top button