कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : भाजपकडे विजय साध्य करण्याइतकी मते | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : भाजपकडे विजय साध्य करण्याइतकी मते

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सतेज पाटील 280 मतदार पाठीशी असल्याचा कितीही दावा करत असले तरी त्यामध्ये तथ्य नाही. भाजपच्या पाठीशी विजय साध्य करण्याइतकी मते असून, ते निकालातून स्पष्ट होईल, असा उल्लेख करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर विधान परिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आ. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारपासून संपर्क दौरा सुरू केला. इचलकरंजी येथे आ. प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक झाली. यावेळी इचलकरंजी, हुपरी, हातकणंगले नगरपरिषदांचे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचा दावा आकडेवारीवर टिकणारा नाही. काँग्रेस व मित्रपक्षांचे 118 सदस्य आहेत, तर भाजपचे 105 सदस्य असून प्रकाश आवाडे, विनय कोरे या आमदारांसह सहयोगी सदस्यांची मिळून 165 मते आहेत. त्यामुळे खोटे आणि फुगीर आकडे सांगून विजय मिळत नाही. भाजपला विजयासाठी आणखी 43 मतांची गरज असून, त्याची जुळणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेने कधीही भाजपला मदत केलेली नव्हती; पण यावेळी काही मते मिळतील याबाबत आशावादी आहोत.

यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जि.प. सदस्य राहुल आवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, स्वप्निल आवाडे, हुपरीचे उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे, नगरसेवक सूरज बेडगे, पृथ्वीराज महाडिक आदी उपस्थित होते.

270 मतांचा आकडा सांगून जनतेची दिशाभूल

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

विधानपरिषद निवडणुकीच्या रणांगणात भाजपची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील हे 270 मतांचा आकडा सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. वास्तविक त्यांनी चुकून आकडा सांगितला असून, 415 सांगितला पाहिजे होता, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या विजयाच्या दाव्याची खिल्ली उडविली.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी नगरसेवकांच्या भेटीसाठी आले असता ते बोलत होते. भाजपचे उमेदवार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, केडीसीसी बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांची बंद खोलीत चर्चा झाली.

आ. पाटील म्हणाले, जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे फारशी चिंता नाही. काँग्रेससोबत दोन पक्ष जोडले असले, तरी आमच्याकडे आवाडे, कोरे यांचे पाठबळ आहे. भाजप ही निवडणूक ताकदीने लढवणार व जिंकणार आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, रामदास मधाळे, सीताराम भोसले, दयानंद मालवेकर, उदय डांगे, आजम गोलंदाज, अनुप मधाळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पाहा व्हिडिओ : एस.टी कर्मचाऱ्यांना जेवण कोण देतंय !

Back to top button