सांगली : म्हैसाळ योजनेतून तलावे भरण्यासाठी विजापूर गुहागर महामार्ग रोखला

सांगली : म्हैसाळ योजनेतून तलावे भरण्यासाठी विजापूर गुहागर महामार्ग रोखला
Published on
Updated on

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील मुचंडी, दरीबडची, दरीकोनुर, सिद्धनाथ व संख येथील तलावात म्हैसाळ योजना किंवा तुबची बबलेश्वर या योजनेतून पाणी तात्काळ सोडावे, चारा छावण्या किंवा चारा डेपो त्वरित सुरू करावा, या मागण्यांसाठी मुचंडी येथे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास महामार्ग आंदोलकांनी रोखला. १५ दिवसात मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे युवा नेते रमेश देवर्षी यांनी सांगितले.

दरम्यान म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय अभियंता गणेश खरमाटे, विजय कांबळे, राजेश घाडगे, मोहन शिंदे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे आदींना याप्रकरणी निवेदन देण्यात आले. म्हैशाळ उपसा सिंचन योजनेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर शक्य त्या ठिकाणी पाणी सोडणार असल्याचे लेखी आश्वासन आधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात युवा नेते रमेश देवर्षी, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, शंकरराव वगरे , तम्मा कुलाल, सागर शिनगारे, अमीन शेख, शशी पाटील, राघवेंद्र चौगुले, यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

 गेल्या ६ महिन्यापासून मुचंडी, दरीबडची, सिद्धनाथ, दरीकोनुर ही तलावे कोरडी ठणठणीत पडले आहेत व संख तलाव हे कोरडे पडण्याच्या स्थितीत आहे. या तलावांना पाणी सोडल्यास बरीच गावे टँकर मुक्त होतील. व शासनाच्या तिजोरीवर पडणारा खर्च थांबण्यास मदत होईल. म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील देवनाळ या गावी पोहचले आहे. देवनाळपासून सिद्धनाथ तलाव, संख तलाव सायफन पद्धतीने शासनाचा एकही रुपया न खर्च करता भरून देता येईल. तसेच योजनेचे पाणी शेड्याळ या ठिकाणीही पोहोचले असून तेथून मुचंडी, दरीकोनुर व दरीबडची तलावे भरता येतील. ही तलावे भरल्यास १० ते १२ गावांना पाणी टंचाईचा त्रास कमी होईल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असल्याने शासनाने यांची गांभीर्याने दखल घ्यावी व पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

आमदार विक्रम सावंत यांचा आंदोलनाला पाठिंबा

आमदार विक्रम सावंत यांनी आज (दि.१) दुपारी बारा वाजता आंदोलनस्थळी भेट दिली. व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच काँग्रेसचा आमदार म्हणून निधी वाटपात देखील दुजाभाव केल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच माजी सभापती भाजपचे युवा नेते तमन्नागोंडा रवी पाटील यांनीही आंदोलनास्थळी भेट दिली. व आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news