परभणी: १६०० रूपयांची लाच घेताना महावितरणचे २ कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

परभणी: १६०० रूपयांची लाच घेताना महावितरणचे २ कर्मचारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जुन्या घर मालकाच्या नावाचे वीज मीटर खरेदीदाराच्या नावे करण्यासाठी १६०० रूपयांची लाच घेताना महावितरणच्या शहर उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ सहायकाला आणि बाहयस्त्रोत तंत्रज्ञ कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.१) केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परभणी शहरात एकाने नवीन घराची खरेदी करून जुन्या मालकाच्या नावे असलेले वीजमिटर आपल्या नावाने करण्यासाठी महावितरणकडे रितसर ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. तक्रारदार ३० नोव्हेंबररोजी अर्ज व फि पावती देण्यासाठी महावितरणच्या शहर उपविभाग कार्यालयात गेला होता. यावेळी तेथील बाहयस्त्रोत तंज्ञत्र जयश्री तुळशीराम चव्हाण यांनी त्या तक्रारदाराकडून ऑनलाईन अर्जाची प्रत घेत त्याला पोच पावती दिली. व हे काम पूर्ण होण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले. तसेच काम लवकर करून घ्यायचे असेल, तर पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या तक्रारीवरून एसीबीने केलेल्या पडताळणी कार्यवाहीत बाहयस्त्रोत तंत्रज्ञ जयश्री चव्हाण यांनी कनिष्ठ कार्यालयीन सहायक ज्ञानेश्‍वर सखाराम लहाने यांच्या सांगण्यावरून १६०० रूपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष करत आज कार्यालयात ही रक्‍कम स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या दोन्ही कर्मचार्‍यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केला.

ही कारवाई एसीबीचे नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी परभणीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, आदीनी केली.

हेही वाचा 

Back to top button