ग्रामस्थांचा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा | पुढारी

ग्रामस्थांचा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण विभागाच्या चुकीच्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करण्यात येत असल्याने भोयरे गांगर्डा येथील ग्रामस्थ, पालक व शालेय व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. शिक्षकाचे समायोजन (बदली) तत्काळ थांबवा, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा तालुक्यातील भोयरे गांगर्डा ग्रामस्थांनी दिला. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, भोयरे गांगर्डा प्राथमिक शाळेचा पट सन 2022 -23 चा सरल पोर्टलनुसार 61 होता. 2 विद्यार्थी ऑफलाईन होते. परंतु आधारमुळे ऑनलाईनमुळे पट 60 दाखवत होता.

त्यामुळे एक शिक्षक अतिरिक्त होत आहे. आता सन 2023-24 चा पट 64 असून सन 2023-24 घ्या संचमान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत नाही. एवढे असूनसुद्धा एक शिक्षक अतिरिक्त ठरविला जात आहे. त्यामुळे इयत्ता 1 ली ते 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता पाचवीचा पट 17 असून 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतील, असे आहेत. चालू वर्षाच्या पटानुसार कोणताही बदल न करता इयत्ता 1 ली ते 5 पर्यंत आहे, तेच शिक्षक कायम करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या निवेदनाची दखल घ्या, अन्यथा पहिली ते सातवीचे सर्व वर्ग बंद ठेवून शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

निवेदनावर माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, माजी उपसरपंच दौलत गांगड, सुधीर पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज डोंगरे, उपाध्यक्ष रवींद्र भोगाडे, मधुकर लगड, शरद पवार, राजेंद्र रसाळ, शरद रसाळ, विजय कामठे, अनिकेत लगड आदींच्या सह्या आहेत.

प्राथमिक शाळांच्या पटसंख्येला घरघर लागली असताना ग्रामीण भागातील शाळा तग धरून आहेत. पटसंख्येनुसार शिक्षक ठेवा, अन्यथा याचे परिणाम शिक्षण विभागाला भोगावे लागतील.
                                                               – संजय पवार, पालक, भोयरे गांगर्डा.

Back to top button