

'सोनेरी टोळी' भाजपच्या महापालिकास्तरीय कोअर कमिटीत आहेे. त्या टोळीला कंटाळूनच भाजपच्या काही नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे, असा पलटवार महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, विकास कामांचा निधी 'पीडब्ल्युडी' ला देण्याची प्रथा भाजपनेच चालू केली आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांचा कोट्यवधींचा निधी पीडबल्युडीमार्फतच खर्च झाला असल्याकडे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले.
बागवान म्हणाले, सोनेरी टोळी कोणत्या पक्षात आहे, हे जगजाहीर आहे. घनकचरा प्रकल्प कोणी व का परत पाठवला, कोणाच्या काळात हे झाले?
महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील विकास कामांचा निधी 'पीडब्ल्युडी'कडे देण्याची प्रथा भाजपनेच चालू केली आहे. सन 2016-17 मध्ये भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे यांच्या निधीतील 61 कोटी रुपये पीडब्ल्युडीकडे वर्ग झाले आहेत. त्यानंतरही दरवर्षी त्यांचा निधी पीडब्ल्युडीकडे वर्ग होत आहे. शामरावनगर येथील एका कामाचा निधीही पीडब्ल्युडीकडे वर्ग करणे भाग पाडले. सन 2021 मध्ये भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा निधी आमदारांनी पीडब्ल्युडीला दिला आहे. भाजपचे हे नगरसेवक आमदारांविरोधात आंदोलन करणार आहेत का?
महापालिकेमार्फत झालेली कामे निकृष्ट आहेत, कामांचा दर्जा बरोबर नसल्याचे स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी म्हणत आहेत. स्थायी समितीत अनेक कामांची चौकशी लावली आहे. चौकशीचे एवढे आदेश दिले आहेत की महापालिकेच्या बांधकाम विभागाला काम करायला वेळच ठेवललेला नाही. सभापतींनी स्वत:च्या भावाच्या प्रभागातील कामाचीही चौकशी लावली आहे. कामे दर्जेदार होत नसतील व कामांचा बोजा असेल तर 'पीडब्ल्युडी'कडून कामे करून घेण्यात चूक काय, असा सवाल बागवान यांनी उपस्थित
केला.
"भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मंजूर 50 लाखांचा निधी दि. 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या पत्राने पीडब्ल्युडीकडे वर्ग केला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 19 आणि 8 मधील ही कामे आहेत. भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, भाजपचे नगरसेवक संजय कुलकर्णी, सविता मदने, जगन्नाथ ठोकळे, राजेंद्र कुंभार, सोनाली सागरे, कल्पना कोळेकर यांच्या प्रभागातील ही कामे आहेत. आमदारांना भाजपच्या नगरसेवकांवर विश्वास नाही असे म्हणायचे काय", असा सवाल महापौर सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.
महापौर सूर्यवंशी म्हणाले, नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतील 11.30 कोटींच्या कामात काहीही बदल केलेला नाही. आहे तीच कामे आहेत. महापालिका क्षेत्रातील मागासवर्गीय आरक्षित 11 प्रभाग सोडून इतर कामे घातलेली नाहीत. त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय हा आरोप दिशाभूल करणारा आहे. कामे वेळेत व्हायला पाहिजेत यासाठी हा निधी वर्ग झालेला असावा.