सांगली: आटपाडी शहरातील खड्डे न भरल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार : अनिता पाटील | पुढारी

सांगली: आटपाडी शहरातील खड्डे न भरल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार : अनिता पाटील

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा: आटपाडी शहरातील मुख्य रस्त्यावरील मुजविलेले खड्डे पुन्हा पूर्ववत झाल्याने बांधकाम विभागाने खड्डे मुजविण्याचा केवळ स्टंट केला आहे, असा आरोप करून दोन दिवसांत खड्डे न मुजविल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी आज (दि.१२) पत्रकार परिषदेत दिला.

पाटील पुढे म्हणाल्या की, खड्डे मुजविण्यासाठी ११ लाख ८५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक होते. काम केल्यावर अवघ्या दोन आठवड्यांत खड्डे पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त खड्डे भरण्याचा स्टंट केला आहे. खड्डे मुजविण्याच्या अंदाज पत्रकाबद्दल चौकशी केली असता बांधकाम विभागाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीनुसार खड्डे भरण्याचे काम १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबरदरम्यान केले असल्याचे समोर आले आहे.

साई मंदिर चौक ते पोलीस स्टेशन दरम्यानच्या दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरातील खड्डे भरण्याचे काम एका कराड येथील ठेकेदाराला देण्यात आले होते. याचे अंदाजपत्रक ११.८५ लाखांचे होते. पण कामासाठी नेमका किती खर्च झाला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

काम झाल्यावर अवघ्या आठ दिवसांत खड्डे उघडे पडले. त्यामुळे खड्डे भरत असताना शाखा अभियंता कामाच्या वेळी उपस्थित होते का? कामाचा दर्जा तपासला होता का? असे अनेक प्रश्न पाटील यांनी यावेळी उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. आटपाडी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे दोन दिवसांत न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आटपाडी शहरातील मुख्य पेठेतील रस्त्याचे काम टेंडर होऊन देखील सुरू झालेले नाही. माहिती अधिकार अंतर्गत बांधकाम विभागाने मुख्य पेठेतील गटारीचे काम प्रस्तावित असल्याने या रस्त्याचे काम सुरू केले नसल्याचे म्हटले आहे.त्यामुळे गटारीचे कामास मंजुरी न देता थेट सिमेंट रस्त्यासाठी निधी कसा मंजूर करण्यात आला. हा निधी मंजूर करणाऱ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा नगरपंचायतने का लक्ष दिले नाही ? असा सवाल करत नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा अनिता पाटील यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button